पान:गांव-गाडा.pdf/155

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४      गांव-गाडा.

कळावयाचें नाहीं; ' इत्यादि वाक्प्रचार लोकांमध्ये ह्या वर्गासंबंधानें वसत असलेली, खरी म्हणा खोटी म्हणा, साशंक भीति दर्शवितात.

 गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, हिजडे, मानभाव, फकीर, वगैरे देवाचें नांव पुढे करून भीक मागणारे लोक-मग ते फिरस्ते असोत किंवा स्थाईक असोत-हा नुसता निरुपयोगीच नव्हे तर समाजघातक वर्ग आहे. ब्राह्मणापासून तो सर्व वर्गाच्या व सर्व जातींच्या लोकांना ह्या वर्गात शिरतां येते. विष्णूचा पेला प्याला म्हणजे बैरागी होतो, शिवाचा पेला प्याला म्हणजे गोसावी, पिराचा प्याला ह्मणजे फकीर होतो इत्यादि. ह्यांनी संसार नांवाला सोडलेला असतो. त्यांपैकी बहुतेक संसारिकांपेक्षाही लालुची, लंफंगे, तामसी व दुर्व्यसनी असतात; आणि लोकही विशेषतः मारवाडी, गुजराती, उदमी व पाटील त्याना इच्छाभोजन, भांग,गांजा, अफू देण्यांत पुण्य मानतात. कोणी आईबापांवर तर कोणी बायकामुलांवर रूसून साधू फकीर होतो, कोणाला आधिव्याधीमुळे प्रपंच नकोसा होतो तर कोणाला पोटाची ददात, यातायात नको असते. ह्या वर्गाची खाण्यापिण्याची मौज, निष्काळजीचें बिनदगदगीचे आयुष्य, कोणाच्याही कह्यांत. वागणे नलगे अशी स्वच्छंदी प्रवृत्ति, लोकांकडून मिळणारा सन्मान, आत्मोद्धाराचें मृगजळ, आणि लांड्या कोल्ह्यांनी व मुंडणाऱ्यांनी ह्या जीवनवृत्तीसंबंधाने भरलेले खासें नामी छत इत्यादींना भुलून पुष्कळ मुलगे, मुली, गफलतीने गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, भोप्ये, आराधी, जोगतिणी, भाविणी, मानभाव, फकीर वगैरे होतात. मुलें होत नसली किंवा होऊन ती वांचत नसली अशा स्त्रीपुरुषांना हे लोक अंगारा, प्रसाद, व आशिर्वाद देतात; आणि सांगतात की, पहिले किंवा अमुक एक फळ देवाला वाहा म्हणजे तुझें पोट पिकेल, व वस्तीवाडी वाढेल. गरजवंताला अक्कल नसते. लोक बिचारे कबूल करतात, आणि जुनी लंगोटी देण्यास मागेंपुढें करणारे पोटचा गोळा तटकन् तोडून गोसावी, बैरागी, वाघ्या, भोप्या, जोगतिणी, मुरळी, फकीर, मानभाव ऊर्फ भवाळ इत्यादींच्या पदरांत टाकतात ! अशी एक समजूत आहे की, संकल्पाप्रमाणे मूल वाहिले