पान:गांव-गाडा.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १३३

पूर्वापार रूढीप्रमाणे १००,२०० तें हजारों वारकऱ्यांना लोक भक्तिभावाने भाजीभाकरी पुरवितात. ह्याखेरीज दिंडीतले वारकरी वस्त्रप्रावरण, जोडे, घोंगड्या, छत्र्या, पैसे वगैरे उकळीत चालतात ते वेगळे. कानफाटे किनरीवर गोपीचंदाची गाणी म्हणतात व पीठ पैसे मागतात. भैरवदीक्षेचे गोसावी संध्याकाळी आल्लक पुकारीत पीठ मागतात. गोसावी-बैरागी घरोघर पीठ कपडा आणि गांजा तंबाखूला किंवा यात्रेला अगर एखाद्या मंदिराला पैसे मागतात. ते कधी कधी त्रागा करूनही पैसे काढतात. अघोरी राखेचा बोकणा तोंडांत भरून मेल्यासारखा पडतो तिळाची पेंड कुजविली म्हणजे तिची विष्टेसारखी घाण येते. याप्रमाणे नकली विष्टा खाण्याची भीत घालून अघोरी पैसे उकळतो. नानकशाही, कबीरपंथी पैसे मागत गांवोगांव हिंडतात. फकीर, शिद्दी भाकरी, पीठ, कपडा व पैसा मागतात. फिरस्त्या बैराग्यांपेक्षाही फकिरांचे वर्तन आतताईपणाचे व रंगेलपणाचें असतें. रफई फकीर गुरुजाने भोसकून घेण्याची किंवा मानेंतून 'सुलतानी' (सळई) घालण्याची जरब देऊन पैसे काढतात. मानभावांच्या झुंडीच्या झुंडी धान्य व पैसे गोळा करतात. 'बाहेरून काय मानभावीपणा दाखवितो, मानभावाप्रमाणे त्याचे मत कांहीं केल्या

-----

 १ सन १८०८ साली पैठणच्यानजीक दहा बारा गांवांत सुमारे २० फकिरांची टोळी पांच रुपये व घोडा पाहिजे म्हणून सवाल घालीत फिरत होती. त्यांना एका गांवाने पंधरा वीस रुपये करून दिले. त्यांत कुलकर्ण्यानें रुपया व पाटलानें आठ आणे दिले. कारण विचारतां गांवकऱ्यांनी असे सांगितले की, " फकिर दारांतून हलेना, तो फिरस्ता पडला. आगबिग लावली तर त्याचे घेतां काय?"

 २ सन १९०८ सालच्या आरंभी शेवगांव तालुक्यांतील खानपिंप्री गांवीं दोन प्रहरी कांहीं मानभाव आले, आणि सांगू लागले की, पन्नास मूर्ती गांवावरून उपाशी चालल्या आहेत. गांवाने साडेचार मण धान्य त्यांना करून दिले, त्याचे त्यांनी त्याच वेळी गांवच्या वाण्याजवळ ढिल्या भावानें टक्के केले आणि रोकड पैसे घेऊन ते चालते झाले.