पान:गांव-गाडा.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२      गांव-गाडा.

डोंबारी, कसरतीचा खेळ करतात. त्यांच्याजवळ म्हशी असतात आणि ते त्यांचे दूधतूप विकतात. गांवकऱ्यांच्या म्हशी राखोळीला घेऊन ते अखेर गुंगारा देतात. कोल्हाटी कसरतीचा खेळ, नाचतमाशा करतात. त्यांच्या नायकिणी कसब करतात.कोल्हाट्याची पालें गांवांवर आली म्हणजे उपदंशाचा प्रसार होतो. आपणाजवळ उपदंशाची व पुष्टतेची रामबाण औषधे आहेत, अशी बढाई कोल्हाटिणी मारतात, व लौकिक समजूतही अशीच आहे. खानदेशांत कोल्हाट्याप्रमाणे 'उघड्या मांडीचे '( राजरोष ) कसब करणारी हरदास नांवाची जात आहे. रायनंद, बहुरूपी, भवय्ये ( गुजराती ) हे नानाप्रकारची सोंगें आणून पैसे, धान्य व वस्त्रे मिळवितात. ह्यांचा बेडा मोठासा नसतो. चित्रकथी मोठ्या जमावाने फिरतात. एका गांवीं त्यांची ३० पाले उतरली; त्यांत माणसें १२७, घोडी ५, म्हशी ७०, व १७ शेळ्या होत्या. हे म्हशीची हेड करतात, व दूधतूप विकतात. जातीचा एखादा इसम सिता, बभ्रुवाहन वगैरेंची चित्रे काढतो व चित्रपट लोकांना दाखवितो; आणि बायका काशाच्या थाळ्यावर मेण व काडी लावून परोपरीची गाणी म्हणतात. तरुण स्त्रिया शेतकऱ्याची थट्टामस्करी करतात, व कसबही करतात; त्यांना 'मैना' म्हणतात. पुरुष व स्त्रिया गांवांत भाकरी, वस्त्र व शेतांत धान्य, पेंढी मागतात. पिकाची चोरी करण्यांत ही जात अट्टल आहे. मांगगारोड्यांची टोळी सर्वांत दांडगी असते. एके गांवीं त्यांचा परिवार येणेप्रमाणे आढळून आलाः- माणसें ११९,म्हशी २०, हेले ४, गाय१, बैल २, घोडे २, बकरी ६, शिवाय कोंबड्या, कुत्री. हे गांवाबाहेर पालांत उतरतात, म्हशी विकतात व भादरतात, नजरबंदीचा गांवगुंडी खेळ ढोल वाजवून करतात, आणि भीकही मागतात. हे जबरदस्त चोर व कांगावखोर असतात; धान्य, कापूस, शेळ्या, मेंढ्या, म्हशी, कोंबड्या, चोरतात; आणि उभ्या पिकांत आपली जनावरें चारतात. हे थोडासा विसार देऊन भाकड म्हशी फळविण्याचा बहाणा करून घेतात, व त्यांना दूरच्या बाजारांत विकून पैसे गट्ट करतात. गांवकरी ह्यांच्या