पान:गांव-गाडा.pdf/142

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १२१

ओढतो, आणि सूप अर्धसूप धान्य, पैसे व कपडे गोळा करतो. तिरमल ऊर्फ नंदीबैलवाले, मेढिंगे ऊर्फ ठोकेजोशी, कुडमुडेजोशी, वासुदेव, पांगूळ, हे गांवाबाहेर गोदड्याच्या किंवा पोत्याच्या पालांत उतरतात. त्यांचीं दहापांच बिऱ्हाडें मेळानें फिरतात. त्यांजवळ म्हशी, बैल, बकरें, तट्टे, कुत्रीं, असतात. तिरमल नंदीबैल शिकवून त्याच्याकडून होरा वदवितात. त्यावेळीं ते गुबगुबी व घड्याळ वाजवितात. ते धान्य, वस्त्र, पैसे मागतात. त्यांस दर घरचा १ पैसा मिळतो. त्यांच्या बायका गोदडया शिवतात व पोत, सुई, दाभण विकतात. एका गांवीं तिरमलांचा तळ येणेंप्रमाणें होता: माणसें ३०, नंदीबैल एक, तट्टे ७,टोणगे २, ह्मशी ४, बैल१०,शेळ्या ५, कुत्रीं ८,शिवाय कोंबड्या. मेढिंगे ऊर्फ ठोकेजोशी सकाळीं भस्म, गंध लावून डोक्यावर पागोट्याची ढाल ठेवून लफ्फेदार रेशीमकांठी धोतर नेसतात, आणि हातांत पंचांग घेऊन कुणब्यांना शुभाशुभ ग्रह, होराठोका सांगण्याला शेतोशेतीं जातात. त्यांच्या बायका सुई, पोत वगैरे विकतात. ते गायी, ह्मशी, तट्टे, विकून हजारों रुपयांचा व्यापार करून राहिले आहेत. कुडमुडेजोशी, गुरुबाळसंतोष, वासुदेव, पांगूळ रामप्रहरीं पाऊड गाऊन आयाबायांना व लेकरांना आशिर्वाद देतात. त्यांच्या पाऊडांत यात्रांच्या ठिकाणच्या देवांचीं नांवें व क्वचित वडेिलांचीं नांवें असतात. त्यांच्या बायका ' वाकळ' (गोदडी ) शिवतात, व घोंगड्या तुणतात. कुड्मुडेजोशी कुडमुडे वाजवितो. वासुदेव टाळ, चिपळया, व पावा वाजवितो, आणि त्याच्या डोक्याला मोरपिसांची टोपी असते; त्याला दर घरीं पैसा दोन पैसे मिळतात. राऊळ कोठं कोष्ट्यांंच्या फण्या भरतात, पण बहुधा पहाटेस भला मोठा त्रिशूळ घेऊन एखादा दोहरा म्हणत भीक मागतात. दरवेशी मुसलमान असतात, ते वाघ आस्वलाचे खेळ करून सुगीच्या दिवसांत खळीं मागतात. त्यांना बागवाले (वाघवाले) असेंही म्हणतात. मदारी गारोडी मुसलमान असतात व तें सापाचा आणि नजरबंदीचा खेळ करतात. मुसलमान बंदरवाले, वानर, माकडें, व बोकड ह्यांचे खेळ करतात. गोपाळ