पान:गांव-गाडा.pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      ११९

कुंचेवाले ऊर्फ माकडवाले ही कैकाट्यांची पोटजात आहे. ते गांवाबाहेर सुरड नांवाच्या गवताच्या पालांत उतरतात. त्यांची दहा बारा बिऱ्हांडे एकमेळाने असतात, व त्यांबरोबर माकडे, गाढवें, बकरी, कोंबड्या, कुत्री असतात. ते माकडांचा खेळ करतात व साळी, कोष्टी, धनगर, मोमीन वगैरेंच्या कुंच्या बांधतात. ह्या कुंच्या ते गवताच्या मुळ्यांच्या करतात; व त्या सव्वा ते दीड रुपयाला विकतात. त्यांच्या बायका बायकांना गोंधतात, शिंदीचे खुळखुळे विकतात, व सुपें, टोपली फोकाट्यांनी सांधितात. बायका, पुरुष, पोरें गांवांत तुकडे व शेतांत धान्य मागतात. एका गांवीं कुंचीवाल्यांची ४ पाले उतरली होती; त्यांत माणसें २३, गाढवें २२, कुत्रीं ५, माकडे ५, बोकड २, व एक कोंबड्याचा झांप होता. कंजारी ही सांनसी नांवाच्या दरोडखोर जातीची एक पोटजात आहे, व ती गांवाबाहेर पालांतून उतरते. ते साळी वगैरेंच्या कुंच्या बांधतात; शिंकी, हातळ्या, जोती-जुंपण्या, पिछाड्या, मोहक्या वगैरे करतात; आणि कानांतला मळ काढतात. त्यांच्या बायका टाळ्या पिटून अचकटविचकट हावभाव करून उखाणे म्हणतात, आणि ऐकणाराला अगदी शरमून टाकून भीक उकळतात. लमाण, वंजारी हे पूर्वी बैलांचे तांडे घेऊन मीठ व सरपण ह्यांची नेआण करीत. आताही काहीजण बैलांचे भाडे करतात, व जनावरें राखोळीला घेतात. त्यांच्याजवळ कुत्रे फार नामांकित असतात. ते गांवाजवळ मैदानात उतरतात आणि त्यांच्या तांड्यांत १०० -२०० बैल व ५० -६० माणसें असतात. ते बैल, शेळ्या, मेंढ्या व उभी पिकें ह्यांची चोरी करतात. वैदू गांवापासून एक दोन शेतें दूर उतरतात. त्यांची दहा बारा बिऱ्हाडे जमावाने फिरत असतात. त्यांच्याजवळ गाढवें, शेळ्या, कोंबड्या, व पुष्कळ शिकारी कुत्री असतात. ते ससे, तरस, घोरपडी, सर्प, मगर धरतात. कोणाच्या घरी साप निघाला तर शेरभर दाणे घेऊन ते तो धरतात. त्या वेळी ते पुंगी वाजवीत असतात. तापीकांठी मगरांना त्यांचा इतका दरारा आहे की, वैदूचा शब्द कानी पडतांच वाळवंटांत असलेले मगर