पान:गांव-गाडा.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      ११७

कुसरीचा अगर मनोरंजनाचा दर्शनी धंदा असतो, व कांहीं निवळ भिक्षार्थी असतात. परंतु बाहेरचा बुरखा जरा ओढला तर अशी खात्री होईल की, बहुतेकांची मदार भिक्षेवर आणि भिक्षेच्या आडून फसवेगिरी, दगलबाजी, चोरीचपाटी, ह्यांवर व कांहींची व्यभिचारावर देखील असते. वतनदार व उपलाणी फिरस्ते नुसती भीक म्हणून शेकडा दोन ते चार शेतमाल हडसून खडसून नेतात. चोरीचपाटी ह्याखेरीज. फिरस्त्यांमधील वरिष्ठ जातींचे भिक्षुक व साधु हिंदु असल्यास मठांत किंवा देवळांत व मुसलमान असल्यास मशिदीत, दरग्यांत उतरतात; आणि दोन्ही धर्माचे लोक सर्रास चावडी धर्मशाळांत उतरतात. गुन्हेगार जाती साधु किंवा फकिराच्या वेषाने गुन्हे करण्यास बाहेर पडतात, तेव्हां त्या ओसाड देवळांत, मठांत, मशिदीत अगर तक्यांत, उतरतात; कांकी त्यांची कृष्णकारस्थानें कोणाच्या नजरेस येऊ नयेत. बाकीच्या भटकणाऱ्या जाती - आपापली जाति-विशिष्ट पाले देतात. पालावरून जात ओळखता येते. बहुतेक आपापली पालें गांवाच्या आत बाहेर शेत दोन शेत दूर ठोकतात, व जमल्यास मुख्य गांवाजवळ न उतरतां गांवाच्या एखाद्या वाडीजवळ पाले लावतात. फांस-पारध्यांना दिवा पाहण्याची अनेगा आहे म्हणून त्यांची पालें लोकवस्तीपासून फार दूर असतात, व त्यांत दिवा म्हणून कधी दिसावयाचा नाही. पिकाची, धान्याची, जनावराची चोरी पचेल अशी चोरट्या जातींच्या पालांची ठेवण असते.

 घिसाड्यांची दोन ते दहा बिऱ्हाडे मुक्कामाला येतात. ती बहुधा गांवाजवळ बारदानाच्या पालांतून उतरतात. दर बिऱ्हाडाला दोन तें दहा गाढवे आणि एक दोन बिऱ्हाडे मिळून एखादी ह्मैस असते. त्यांच्या जवळ तट्टे, बकरी, कोंबड्या, व मोठाले कुत्रे असतात. नांगराचा फाळ, कुऱ्हाडी, कुदळी, वसु, खुरपीं, ऐरण, आंख, धांवा, सुळे, पळ्या, विळे, नाचकंडे, शिवळांचा खुळखुळा, सुकत्या, वडारी-फावडे वगैरे लोखंडकाम हे करतात. त्यांच्या बायका त्यांना लोहारकाम करू लागतात, व पळे, विळे, नाचकंडे वगैरे जिनसा बाजारांत व घरोघर विकावयास नेतात.