पान:गांव-गाडा.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      ११३


करतो. काही ठिकाणी त्याच्याकडे ग्रामदेवतेची पूजा-अर्चा असते. ज्योतिषाचे प्रश्न पाहणे, गांवकऱ्यांची पत्रे लिहिणे, ब्राह्मणेतरांना ब्राह्मण घालणे झाल्यास स्वैपाक करणे वगैरे काही तो करतो. ग्रामजोशी बहुधा ब्राह्मण असतो. काही जाती ब्राह्मणाला लग्नादि संस्काराला बोलवीत नाहीत. वड्डर, कैकाडी, कोल्हाटी, कुंचेवाले वगैरे जातीत लग्ने जातपंच लावतात. जिल्हा नगर तालुका आकोले येथील ब्राह्मणवाडे नांवाच्या गांवांत माहारांची लग्ने महार-भाट लावतात. ग्रामजोशाला कुणब्यांकडून सरासरी उत्पन्नाच्या शेकडा एकच्या आंत बाहेर पेंढी मिळते; शिवाय पंचांगाचे धान्य, व नैमित्तिकाचा शिधा, दक्षिणा मिळते. त्याच्याकडे कुलकर्ण नसले तर पेंढी वगैरे कमी मिळते. मुलान्याचे काम बकरें लावणे हे होय. त्याने फात्या न दिला तर ते मुरदाड राहते, म्हणजे ते हलाल (शुद्ध)होत नाहीं; व ह्या कामासाठी तो अच्छेर मांसाची शेरणी व दोन बैलांचे नांगरामागें तीन पायल्या धान्य घेतो. दर मांसाहारी घरी वर्षांतून फार तर तीन चार वेळां बकरें पडण्याचा प्रसंग येतो. मुलान्याला खळ्यावर सुमारे शेकडा एक तें पावणे दोन बलुतें मिळतें. बकरें मारण्याबद्दल उपऱ्याकडून तो एक आणा घेतो. गांवांत फकीर नसला तर गांवचा ताबूत मुलाना करतो. कोळी पखालीने पाणी भरतात, व भांडी घांसतात. मराठमोळ्याच्या घरी ही कामें ते दररोज करतात, व त्यांबद्दल त्यांना भाकरी मिळते. शिवाय त्यांना शेकडा एकच्या आंत बलुतें मिळतें.

 गोंधळी, भराडी, मुरळ्या, वाघे हें लग्न-कायांत गोंधळ किंवा जागरण घालतात, व देवाच्या उत्सवांत आपापली कामें करतात. कलावंतीण उत्सवांत, यात्रांत नृत्य-गायन करते. भाट, ठाकूर, लग्नांत बाण्या म्हणतात. गुजराती मारवाडी भाट मुऱ्हाळकी करतात व ऐवज पोंचवितात. तांबोळी सणावाराला पांच दहा पानांचा विडा घरोघर देतो. हाळकरी हाळ भरतो. वऱ्हाडांत गारपगार पाऊस सांगतात. मद्रासेकडे पाट साफ ठेवणारे आलुत्ये आहेत. भोई, डोलीवाले, शिंपी, तेली, माळी, कासार, बुरूड, जिनगर, शिकलकर, बेलदार, गवंडी, पिंजारी, नावाडी