पान:गांव-गाडा.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२      गांव-गाडा.


हिस्सा बलुते मिळते. परीट आणि कुंभार ह्यांची कुणब्याला मोठी वर्दळ लागते. 'कुंभारतळे,' 'गाढवलोळी' अशी जमिनींची नांवें गांवोगांव ऐकू येतात; व त्या जमिनी बहुधा गांवानजिक असतात. पूर्वी ह्या जमिनी कुंभार, परीट यांस इनाम असाव्यात व त्यांत गाढवें सुटत असावीत. आता त्या सर्व वहित झाल्या आहेत, आणि कुंभार, परीट तर बाराही महिने आपलीं गाढवें मोकळी सोडतात. ती गांवकऱ्यांच्या गवताची व पिकांची धुळधाण करतात.

 गुरव देवपूजा, देवळाची झाडलोट व दिवा बत्ती करतो; आणि सणावाराच्या दिवशी काही ठिकाणी घर पाहून २ ते १० पत्रावळी देतो, सरकारी झाडांशिवाय शिवारांत पान राहिले नाही, म्हणून पत्रावळीला पाने मिळत नाहीत; अशी सबब सांगून बहुतेक ठिकाणी पत्रावळी देण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. ते कथाकीर्तनाला बोलावणे करतात; व मृदंग वाजवितात, त्याबद्दल त्यांना आरतीची ओवाळणी मिळतें. मृदंग वाजविला नाही तरी गांवगुरव आरतीचे पैसे सोडीत नाहीत. रोकड पैसे व कांहीं हक्क घेऊन गुरव वाजंत्रीपणा करतात. देवपरत्वे देवपूजा गुरवाकडून निघून वाघ्या, भुत्या, भराडी, गोंधळी, जोगी, गोसावी, बैरागी,महार, मांग, व फकीर ह्यांच्याकडे गेली. ज्या मानाने ज्या देवाचा नवसाला पावण्याचा लौकिक त्या मानाने त्याच्या पुजाऱ्याला कुणब्यांकडून पेंढी काडी मिळते. कोठे महादेवाच्या गुरवाला किंवा जंगमाला जास्त तर कोठे खंडोबाच्या वाघ्याला जास्त; कोठे बहिरोबाच्या किंवा देवीच्या भगताला जास्त तर कोठे गोसाव्या बैराग्याला, मानभावाला किंवा तक्यांतल्या फकीराला जास्त; ह्याप्रमाणे गांवोगांव वैचित्र्य दिसून येते. गुरव व त्यासारखे इतर ग्रामदेवतांचे पुजारी ह्यांना कुणब्यांकडून उत्पन्नाच्या शेंकडा एकच्या आंतबाहेर पेंढी मिळते. खेराज नैवेद्य, देवापुढील हमेषचे उत्पन्न, यात्रांचे उत्पन्न, व नवस इत्यादि किफायत होते. पंचांग सांगणे, लग्न लावणे, अंत्यविधि चालविणे, श्राद्ध, पक्ष, देवदेव वगैरे विधि, संस्कार व तिथि-पर्वणी इत्यादि प्रसंगी ग्रामजोशी उपाध्येपणा