पान:गांव-गाडा.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      १११


चिमटे, हातोडे नवे करणे व जुन्यांना तोंडे घालणे; चांभाराच्या आऱ्या, राप्या; कुंभाराची कुदळ, खोरें, खुरपें; मुलान्याच्या सुऱ्या; आणि सर्व वस्तीचे वरील प्रकारचे नवे काम, व जुन्याची शेवटणी वगैरे प्रकारची डागडुजी; कुळवाचा फांस, गाडीचा आंख, धांव वगैरेबद्दल तो रोख मजुरी घेतो. दरवर्षी लोखंडाचा घांस दिला तर फाळ पांच सहा वर्षे टिकतो. कुऱ्हाड, खुरपी वगैरे वर्ष सहा महिन्यांनी शेवटावी लागतात. लोहाराला अच्छेर तें दीडशेर बी व रासमाथ्याला शेंकडा पावणेदोन प्रमाणे बलुतें कुणबी देतात.

 चांभार बलुत्यामध्ये कामें करतो ती येणें प्रमाणे:-मोट शिवणे, तिला ठिगळ लावणे, गोफणीला टवळे लावणे, जुना जोडा, आसूड सांधणे; सारांश गोठभर वाघी लागेल इतके कुणब्यांचे व आलुत्याबलुत्यांचे काम करणे. नवीन जोडा, आसूड, मोट वगैरेंबद्दल रोख पैसे पडतात. चांभाराला कुणबी दोन शेर बी व शेंकडा सवा दोन बलुतें देतात.

 कुंभार घागरी, दुधाणे, ताकाचा डेरा, सुगडें, वेळण्या, पंथ्या, चिटकी ( कोरड्यासाची ) वगैरे बलुत्यांत देतो; व रांजण, कोथळी वगैरे मोठ्या जिनसा रोखीने विकतो. कुणबी कुंभाराला शेर अच्छेर बी व शेकडा सवा बलुते देतात. न्हाव्यांला लहानथोर दर डोकीमागे दोन ते चार पायल्या बलुतें व हजामतीचे दिवशी एक भाकरी असें मिळते. ते करगोटा घालणाऱ्याला हिशेबांत धरतात. कुणब्याची हजामत महिन्या-तीनवारां होते, आणि खेड्यांत हजामतीला पाव आणा अर्धा आणा पडतो. ह्या हिशेबाने फार तर आठ दहा आणे होतात. चौल, शेंडी राखणे, वगैरे प्रसंगी न्हाव्यांना खण, शिधा, ओटी व कांहीं रोकड अशी जास्त किफायत होते. काहीं ठिकाणी वरीलप्रमाणे धान्य न देतां उत्पन्नाचे शेकडा पावणेदोन बलुतें देतात. परीट लग्नकार्य, सोयर, सुतक वगैरे प्रसंगी गांवकऱ्यांचे धुणे धुतो. तो लग्नांत नवरानवरी ह्यांच्यावर चांदवा धरतो, व पायघड्या घालतो. गांवांत सधन व मराठमोळ्यांच्या घरांचे धुणे परटाकडे असते, त्याबद्दल त्याला रोज भाकर देतात. परटाला शेर अच्छेर बी व न्हाव्याच्या तिसरा