पान:गांव-गाडा.pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वगेरे सर्व उत्कृष्ट अवगत असे, तें इतकें कीं पाऊल, पोषाख, शब्द इत्यादींवरून लांबून येणारा-जाणाराची जात देखील गेल्या पिढीपर्यंत पुष्कळ लोक नक्की सांगत. विद्यापीठे व उद्योगधंदे शहरांत फैलावल्यापासून बरेच लोक तेथेंच स्थाईक होतात, निदान खेड्यांत क्वचित जातात; आणि गेले तरी अनेक कारणांमुळे बायका-पोरांना फारसे बरोबर नेत नाहींत. म्हणून अलीकडील पिढीचा बहुतेक काळ शहरांत जातो आणि गांवढयाच्या खांचाखोंचांशीं त्यांचा फार बेताबाताचा परिचय होतो. मी जरी पुष्कळदा स्वतःच्या व आप्तांच्या गांवीं जाई, तरी मुलकी खात्यांत शिरकाव झाल्यावर, आणि त्यांतले त्यांत जाती-जातींच्या चालीरीतींची माहिती कशी गोळा करावी ह्याचें वळण मे. एंथोवेन साहेब बहादूर सुपरिंटेंडंट एथ्नॉंग्राफिकल सव्हें इलाखा मुंबई ह्यांनीं घालून दिल्यावर व तें दोन तीन वेळां गिरवून घेतल्यावर खेड्यापाड्यांनीं मुकाम पडून लोकांशीं सुखदुःखाच्या गोष्टी करतांना अनेक बाबींची परंपरा कानावर येऊं लागली, व दृष्टि अन्तर्मुख होऊं लागलीसें वाटून खेड्यांचें अंतरंग तिजवर थोडेसें उमटल्याचा भास झाला. खेडयांचा अनुभव फारसा नसेल अशा गृहस्थांना खेडीं व फिरस्ते ह्यांची बरीच कानी न पडलेली माहिती होतां होईल तों त्यांच्याच भाषण-संप्रदायांत प्रस्तुत पुस्तकामध्ये मिळेल; आणि तें लिहिण्याचा हा एक हेतु आहे, पण तो प्रधान नव्हे. सुधारणेच्या सर्व योजना शहरांत सुरकुंड्या मारतात व खेड्यांंच्या गावकुसाबाहेर थबकतात, पण वेशीच्या आंत म्हणून फडकत नाहीत, असे म्हटलें तर वस्तुस्थितीचा विपर्यास खात्रीनें होणार नाहीं. पहाडात व किर्र जंगलांत अकोलें तालुक्यांतील फोपसंडीसारखीं कित्येक खेडी अशीं आहेत कीं त्यांत दोन प्रहरापर्यंत भगवान् सहस्ररश्मीचा प्रवेश होत नाही, तर मग युगेच्या युर्गे जन-मानस-प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरश्मीला अवसर कोठून मिळणार ? खेड्यापाड्यांनीं, पालाझापांनीं, दऱ्याखोऱ्यानीं; तीर्थक्षेत्रांनीं, मंदीरदर्ग्यानीं सर्व प्रकारच्या व दर्जाच्या सुधारकांना व संशोधकांना किती काम आहे, आणि तें पडून राहिलें तर देशसुधारणा

४ ]