पान:गांव-गाडा.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करूं नये, अथवा त्यांचे विकार व उपाधि ह्यांचा छडा काढूंं नये असें मात्र नाहीं. ह्याच प्रकारचा प्रस्तुत अल्पसा प्रयत्न आहे. तो कितपत साधला आहे हें अजमावण्यासारखी माझ्या तरी मनाची स्थिति नाही. खेड्यांतील स्थाईक व भटकणाऱ्या लोकसमुदायाशीं बोलतां चालतांना त्यांचा तो आनंद, परोपकार, आदरातिथ्य, मायाळूपणा, मनमोकळेपणा, तळमळीचा अभाव, आणि आहे त्यांत संतोष मानण्याची मनाची खंबीर तयारी ह्यांची गारीगार करण्यासारखी आठवण झाली कीं, मन भारल्यासारखें होऊन तदाकार बनतें; आणि ह्यांना काय कमी आहे ह्याचें भान रहात नाहीं. त्यांपैकीं बहुतेकांमध्यें ठसकदार भाषण व निरक्षर शहाणपण इतकं दिसून आलें कीं, त्यांच्या सहवासांत माझें मन अनेक वेळीं दंग होऊन जाई. त्या सुखाची आठवण झाली म्हणजे ह्या बांधवांचें कौतुक किती करावें व उपकार किती मानावेत असें होतें; आणि बुचकळा पडतो कीं, ह्या लोकांमध्यें ज्या सुधारणा व्हाव्या असें आपणांला वाटतें त्या कल्याणपरिणामी होतील ना ? का त्या जांवईशोध किंवा उंटावरील शहाण्याची युक्तिं होतील ? कांहीं असो, इतकें मात्र खास कीं,त्यांनीं जसा मनोभावानें मजजवळ पोटउकाला केला,तसा मीही त्यांच्या सुखांत भर पडावी, आणि त्यांचे-निदान कुणब्याचें तरी-एका पैशाचें काम अधेल्यांत व्हावें, म्हणून मायेनें हा कडूनिंब पुढें केला आहे. तिच्या भरांत जर कोण्या संस्थेसंबंधानें, वर्गासंबंधानें, किंवा व्यक्तीसबंधानें उणें उत्तर निघून गेलें असलें तर तें सर्वानीं मोठया मनानें पोटांत घालावें अशी हात जोडून प्रार्थना आहे.

 ‘कन्या सासऱ्यासी जाये । मागें परतोनी पाहे' ॥ अशाप्रकारें पूर्वी खेड्या-शहरांचें नातें होतें. विद्याव्यासंगी, क्षत्रिय व वैश्य वर्गामधील पुष्कळ जण उद्योगासाठीं खेडयांतून शहरांत जात,परंतु त्यांचें मन आपल्या वतनावरील घरीं व आप्त-स्वकीयांच्या आणि नाना प्रकारच्या जातींच्या लोकांच्या ठिकाणीं गुंतून राही. त्यांशीं ते अत्यंत सलगीनें वागत. त्या मुळे त्यांना खेड्यापाड्यांची राहाटी, रीतिरिवाज, जनस्वभाव, गुणदोष,

[ ३