पान:गांव-गाडा.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      ९३

 गारांना बातमी देऊन बोलावतात, आणि त्यांचे बेमालुम सारथ्य करतात. कारण, पूर्वीचे राज्यांत गांवाच्याबाहेर माग निघाला नाही, तर जागल्याला चोरी भरून द्यावी लागत असे. ही वेसण आतां नाहीशी झाली आहे. सन १८२७ च्या १२ व्या रेग्युलेशनचे ३७वें कलम असें आहे की. एखाद्या गांवांत जबरीची चोरी झाली, किंवा त्या गावाला चोरट्यांचा माग निघाला, आणि ती गांवपोलिसांच्या अगर गावकऱ्यांच्या कसुरीमुळे किंवा फुसलतीमुळे झाली असें निष्पन्न झाले, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेटला चोरीच्या ऐवजाची किंमत गांवपोलीस किंवा गांवकरी ह्यांजपासून दंड म्हणून वसूल करण्याचा व ज्याची चोरी झाली असेल त्याला ती आदा करण्याचा आधिकार आहे. पण ह्या कायद्याचा अंमल झाल्याचे ऐकिवात नाही. सरकारी मालमत्ता, झाडे, जंगल वगैरे सांभाळणे, गुन्हे, अपमृत्यु ह्यांची खबर ठेवणे व पोलीसला देणे वगैरेंची मुख्य जबाबदारी पाटील-कुळकर्ण्यांवर आहे. त्यांनी काळी-पांढरीत चक्कर दिले पाहिजे, व सर्वत्र नजर ठेविली पाहिजे असा निर्बंध आहे. बलुत्याच्या मिंधेपणामुळे या कामांतील महार जागल्यांचा कानाडोळा किंवा आळसाची हयगय पुराव्यानिशी शाबीत करणे दुरापास्त पडते. त्यामुळे पाटील-कुळकर्ण्यांनाच हे काम ओढावे लागते. गांव स्वच्छ ठेवण्याचे काम मामूलपासून महारांकडे आहे. हे काम खासगी नसून सरकारी आहे, आणि तें घरकीचे आहे अशी महारांची समजूत होऊ देऊ नये, असें तारीख २८ जून सन १८८८ च्या सरकारी ठराव नंबर ४२७३ मध्ये फर्माविलें आहे. मेलेलें जनावर महार ओढून नेतात, आणि जवळच नाल्यांत अगर खोंगळीत टाकतात. गांवचे रस्ते झाडण्याचे ते साफ नाकारतात. कोणी मोठा अंमलदार गांवीं येणार असला म्हणजे ते गावकऱ्यांच्या मागें जिकडे तिकडे साफसूफ करण्याची निकड लावतात, आणि आपण फारतर चावडीपुढे व काही ठिकाणी येण्याजाण्याच्या रस्त्यावर खराटा फिरवितात. ज्याचे हद्दीत घाण असेल त्याचेवर फौजदारी खटला होतो, त्यामुळे स्वतः राबून किंवा महारमांगांना मोल देऊन