पान:गांव-गाडा.pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२      गांव-गाडा.


नाही. नकाशे झाल्यामुळे, सडका झाल्यामुळे, व शिपाई लोकांस वाटा माहीत असल्यामुळे अंमलदारांना महार वाटाड्या काढण्याचा प्रसंग कचित् येतो. ठाण्यापासून पांच मैलांवरच्या गांवांच्या कुळकर्ण्याना सर्व्हिस तिकिटें सरकारने दिली आहेत. त्यामुळे गांवीं पोष्ट नसल्यास फार तर पोष्टाच्या गावापर्यंत महारांना सरकारी लखोटे पोचवावे लागतात. वसुलाचे बाबतींत पूर्वीचे तगादे, धरणे वगैरे बंद आहे. वसूल न दिला तर व्याज, चौथाई दंड वगैरे शिक्षा लँडरेव्हेन्यू कोडने ठरविल्या आहेत. वसुलाची मुख्य जबाबदारी पाटील-कुळकर्ण्यांवर असते. तो वक्तशीर न झाल्याबद्दल महारांना कोठेही शिक्षा झाल्याचे ऐकिवांत नाही. म्हणून, कुळाला चावडीवर बोलावणे, दौंडी देणे वगैरेपेक्षां या कामांत जास्त मेहनत महार जागल्यांना पडत नाही. मनिऑर्डरीनें पट्टी पाठविण्याची सोय झाल्यामुळे पाटील-कुळकर्ण्यांचे लिहिणे वाढले, आणि महार जागव्यांचे हेलपाटे कमी झाले. दरोडे बंडाच्या भीतीमुळे गांवाला कूस करून वेशी ठेवीत, व त्या वेसकर राखीत. आतां हवा खेळती करण्यासाठी गांवकूस पाडतात, आणि वेसही कोणी बंद करीत नाही. बहुतेक ठिकाणी त्या मोडून गेल्या आहेत. तेव्हां वेसकराचे काम उडालेच म्हणावयाचें. फार बोभाटा न होईल इतक्या बेताने महार-जागले गांवांत गस्त घालतात. आणि ह्या कामांत फिरतीवरील पोलीसाकडून त्यांची थोडी फार सोडवणूक होते. सडका, रेल्वे, तारायंत्रे झाल्यापासून गुन्ह्यांचे व गुन्हेगारांचे स्वरूप बदलले आहे. आतां या मुलखांतला इसम त्या मुलखांत गुन्हे करतो. त्यांच्या पद्धती व कसब ओळखणे हे गांवपोलिसाच्या वकूबापलीकडचे आहे. म्हणून गुन्ह्यांसंबंधी बहुतेक कामकाज सरकारच्या पगारी पोलीसाला करावे लागते. चोर व जंगली जनावरे ह्यांपासून उभी पिकें, व खळी राखण्याचे काम महार जागल्यांनी अजिबात टाकून दिले आहे; आणि पूर्वीप्रमाणे ते जंगलाची गस्तही करीत नाहीत, व चोरवाटा, माऱ्याच्या जागा, घाट ह्यांवर पहाराही करीत नाहीत. इतकेच नव्हे तर ते स्वतः गुन्हेगार जातीतले असल्यामुळे गुन्हे करतात, अगर पर ठिकाणच्या गुन्हे-