पान:गांव-गाडा.pdf/112

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बलुतें-आलुतें.      ९१


जागले करतात. जागले वतन हे अवलच्या महार वतनाचा एक पोटभाग असल्याने अमके काम महाराचे व अमकें जागल्याचे असा स्पष्ट भेद करतां येत नाही. तथापि, महार मुलकीकडील व जागले पोलीसकडील नौकर असल्याने वरील कामांपैकी जी मुलकी अंमलदारांकडून चालतात ती महार करतात व जी पोलीसाकडून चालतात ती जागले करतात. राज्यव्यवस्थेची सुधारणा होत गेली तसे पाटील-कुळकर्ण्यांचे काम वाढले, पण महार जागल्यांचे मात्र कमी होत गेले. त्यांचे सर्व काम पायपिटीचे असल्यामुळे त्यांत त्यांना चुकवाचुकव करण्याला फार फावतें. शिवाय, ते पूर्वीच्या झोटिंगपादशाहीत पुरे कसून निघाल्यामुळे कामचुकारपणा हा त्यांचा व्यवसायधर्मच होऊन बसला आहे. सरकार-रयतेच्या दृष्टीने पूर्वीचे महारांचे मोठे भरंवशाचे काम म्हटलें म्हणजे शेताच्या बांधउरुळ्या, भाऊ वाटण्या व वहिवाट ध्यानांत धरणे हे होय. पैमाष खात्याने काळी-पांढरीचे नकाशे तयार करवून सर्व्हे नंबर, पोट नंबर ह्यांच्या हद्दनिशाण्या कायम केल्या, तेव्हांच महारांची ही कामगिरी लोपली. शिवाय स्थावरचे कागद नोंदले जातात; आणि पीकपहाणी, बागाईत पत्रके, खानेसुमारी वगैरे मुलकी खात्यांकडून तयार होणाऱ्या कागदांत स्थावरच्या हक्कांचा पुष्कळ चांगला पुरावा रयतेला मिळतो. आतां हक्कनोंदणीच्या पत्रकाने सर्वांवर कडी करून बटाईपासून ता खरेदी, वांटणी, कबजापर्यंत जमिनीवरील सर्व हक्क नोंदण्याची तजवीज लावली आहे. पाटील-कुळकर्णी, सर्कलइन्स्पेक्टर तों रेव्हेन्यु कमिशनरपर्यंत अंमलदारांची हद्दनिशाण्या, अतिक्रमण वगैरेंवर नजर व तपासणी आहे. गांवचे नकाशे व इतर सरकारी दप्तरचे कागद पाहून तेव्हांच अतिक्रमण हुडकून काढतां येते. हद्दनिशाण्या मोडल्याबद्दल पन्नास रुपयेपर्यंत दंड व त्यांतला निमा बातमीदाराला द्यावा, असें लँड रेव्हेन्यू कोडने ठरविले आहे. तरी आजपर्यंत महारांनी अतिक्रमणाचे किंवा बांधउरूळ्यांचे खटले बहुतेक दिले नाहीत, असे म्हटले तरी चालेल. सबब, बांधउरुळ्यांच्या कामांत सरकारला व रयतेला महारांचा व इतर बलुतदारांचा बिलकुल उपयोग उरला