पान:गांव-गाडा.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ८७


भ्रमाचा भोपळा फुटत चालला. कारण, त्यांची पोटदुखी काढण्यासाठी सरकारचा यत्न अव्याहत चालू आहे. कामाच्या पाळ्या ठरल्यामुळे वतनदारांना पाळी संपली, म्हणजे रिकामें बसण्याचा प्रसंग येतो, आणि रिकाम्यांना तेव्हांच उपद्व्याप सुचतात. दुसरा धंदा करणे कमीपणाचें आहे असे कित्येक समजतात. तसेंच गांव सुटला म्हणजे लोकांवरील बस कमी होतो, म्हणूनही पुष्कळजण उद्योगधंदा पाहण्यासाठी गांव सोडीत नाहीत. तशांतून जे गांव सोडून दुसरा धंदा पत्करतात, ते पाळी आली म्हणजे तो धंदा सोडून गांवकीवर येतात. अशा प्रकारें गांवकीवर कोणा एकाचेही धड चालेनासे होऊन यादवी मात्र गांवभर पिंगा घालते.

 आतां वतनांतील 'हिंग गेला आणि वास राहिला.' तरी वतनदारांतील पिढिजाद गुणावगुण एकदम कसे जातील ? स्वतः पैसे मारावेत आणि अधिकाऱ्यांनाही चारावेत, ही पूर्वापार परंपरा, दिवसेंदिवस किफायत घटत चालली; पण गांवकुटारी भानगडी मात्र यथामति, यथाशक्ति चालू आहेत. त्यामुळे पाटील-कुळकर्ण्यांच्या कानीं लागल्याशिवाय परोपकारी माणसाला गांवांत पानसत्रासारखे पुण्याईचे कृत्य करण्याची सुद्धां पंचाईत पडते. आपलें पागोटें शाबूत ठेवण्यासाठी आपणांशी नेहमी संबंध असणाऱ्या हलक्या नोकरांना त्यांना हाताशी धरावे लागते, निदान गप्प बसण्याइतकी तरी त्यांची हरप्रकारें मनधरणी किंवा डोळाचुकव करावी लागते. गांवकामगारांना सरकार आणि रयत यांच्यामधील दुवा म्हणून कितीही आळविलें, आणि प्रसंगविशेषीं शेलापागोट्यांनी त्यांचा बहुमान केला तरी काय होणार ? 'द्रव्येण सर्वे वशाः' अशी जर लोकांची समजूत- मग ती अजाण म्हणा की तिला दुसरे एखादें विशेषण द्या-आहे, तर ओढगस्त पाटील-कुळकर्णी लांचलुचपतीवर पाणी सोडण्याला कसे तयार व्हावेत ? पाटील-कुळकर्ण्यांची कसूर व अपराध उघडकीस आणणे मुष्किलीचे होते. वसुलाची अफरातफर केल्याचा बोभाटा झाला, म्हणजे कित्येक वेळां गांवकरी वर्गणी करून