पान:गांव-गाडा.pdf/107

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६      गांव-गाडा.


ढ्यासाठी कामावर असलेल्या भाऊबंदांच्या चुका काढण्यास, त्यांजवर कुभांड रचण्यास, खोटानाटा पुरावा करण्यास ते सदैव तत्पर असतात; आणि कामगार वतनदारही आपल्या भाऊबंदांस व त्यांच्या गोटांतल्या गांवकऱ्यांस परत टोला देण्याची अगर मेला मुर्दा उकरून काढण्याची एकही संधि वाया जाऊ देत नाहीत. वतनाच्या वारसचौकशीत वतनदारांनी खोटा पुरावा केल्याची उदाहरणे जागोजाग सांपडतील. सारांश, पाटीलकुळकर्ण्यांच्या नांवानें खर्च पडणारा मुशाहिरा बहुतेक अर्ज आणि अपिलें ह्यांच्यांत गडप होतो, असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. वतने मिळविण्यासाठी वतनदार पापपुण्याला बिलकुल भ्याले नाहीत, व भीत नाहीत. पूर्वीच्या अंदाधुंदीच्या काळांत त्यांना अतोनात अवदाने मिळत, आणि सरकारामध्ये त्यांचे वजन असे. गादीवर बसण्यासाठी राजपुत्र हवें तें-वेळेला खुनही करीतः त्याचीच छोटेखानी नक्कल वतन आपल्या नांवाचें करवितांना वतनदार करीत. त्यांची भाऊबंदकी व वतन मिळविण्याप्रीत्यर्थ उलघाल पाहून युरोपियन लोक थक्क होतात. इकडे पाटीलकीसाठी जितकी उलथापालथ होते तितकी त्यांचे मुलुखांत ड्यूक होण्यासाठी कोणी करीत नाहीत. पाटील-कुळकर्ण्यांना वाटले असावें की, इंग्रजीतही आपली पैदास व मानमरातब स्वराज्याप्रमाणे चालेल. म्हणून सरकारी मुशाहिऱ्यावर भिस्त न देता, त्यांनी मनांत मनसुभा केला की, " इंग्रज बहाद्दर मुशाहिरा द्या किंवा नका देऊ, आम्हांला गांवचे दप्तर घेऊन नुसतें चावडीत बसू द्या; म्हणजे तुमच्या नांवावर आम्ही आपलें पोट वाटेल तसे भरूं.” जसजसा इंग्रजी अंमल बसला तसतसा त्यांच्या

-----
( मागील पृष्ठावरून समाप्त.)

केली; पण अखेर डेप्युटी सॅनिटरी कमिशनरकडील दाखला आल्याने गांवचा कागद खोटा ठरला, आणि कुळकर्णीबुवांची मसलत फसली. एका पाटलाने आपल्या तक्षीमदारास दासीपुत्र ठरवून, त्याजवर अबकारी का कोणतासा खटला करविला, व तक्षिमदाराने त्याचेवर कोंडवाड्यांत आलेले घोडें उपटल्याबदल खटला रचला, आणि दोघही पाच सात हजार रुपयांना बुडाले.