पान:गांव-गाडा.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०      गांव-गाडा.७


नॉटपेड पत्रांचे हांशील वसूल करण्याच्या कामी पोस्टखात्याला, दिवाणी कोर्टाची समन्सें, दरखास्तीचे पंचनामे, ताबे-पावत्या, वगैरे कामांत दिवाणी खात्याला गांव कामगार साह्य देतात. गांवांत वहिमी लोकांची ये-जा, फिरत्या गुन्हेगार जातींबद्दल माहिती, गुन्ह्याची स्थिति, वगैरेंसंबंधानें डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ठरवील तितकी रजिस्टरें, पत्रके व रिपोर्ट पाटील-कुळकर्णी तयार करतात. गांवांत गुन्हा अगर आकस्मिक मृत्यु झाला तर त्याची खबर पोलीसठाण्यांत त्यांना ताबडतोब दिली पाहिजे, अपमृत्यूबद्दल पंचकयास केला पाहिजे, व जरूर तर प्रेत डॉक्टरकडे पाठविले पाहिजे. पोलीस-पाटलाला गांवांत गस्त घालावी लागते, आणि मोठा गुन्हेगार पकडला तर त्याला चोवीस तासांत पोलीसठाण्यांत पाठवावें लागते. लहानसान मारामारी किंवा शिवीगाळीची फिर्याद गुन्ह्याच्या तारखेपासून आठ दिवसांत आली तर अपराध्यास बारा तासपर्यंत चावडीत कोंडून ठेवण्याचा अधिकार पोलीस पाटलाला आहे. मुंबईचा सन १८६७ चा अॅक्ट ८ ( गांवपोलीस कायदा) कलम १५ प्रमाणे ज्या पोलीस पाटलाला कमिशन देण्यांत येते, त्याला दोन रुपयांच्या आंतील चोरी किंवा क्रिया करणारास पांच रुपयेपर्यंत दंड अगर दोन दिवस चावडीत साधी कैद, आणि घाण करणारास एक रुपया दंड अगर बारा तास चावडीत कैद याप्रमाणे शिक्षा देतां येते. अनाथ प्रेतें, मेलेली जनावरें, कुत्री वगैरे घाण महार जागल्यामार्फत काढविण्याचे काम म्हणजे गांवांत स्वच्छता, आरोग्य राखण्याचे काम पोलीस-पाटलाचे आहे. गांवांत कोणीही प्रवासी आला तर त्याजकडून पैसे घेऊन त्याला समानसुमान पुरविण्याचे काम पाटील-कुळकर्ण्यांचे आहे. बरसातींत मुलकी, जंगल, पोलीस, दिवाणी वगैरे खात्यांचे कारकून शिपाई, बेलीफ वगेरे गांवगन्ना फिरतात. एक्सैज सब्इन्स्पेक्टर, फाॅॅरस्टगार्ड, पोलीस पोस्ताचा कॉन्स्टेबल, सर्कल इन्स्पेक्टर ह्यांचे त्यांतले त्यांत गांवाला विशेष जाणे होते. बरसात संपली म्हणजे सर्व खात्यांचे अंमलदार फिरतीवर निघतात. त्यांचा बंदोबस्त ठेवण्याचे महत्वाचे काम