पान:गांव-गाडा.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वंदन.

नमस्कार ! वाचकश्रेष्ठ !! महाराष्ट्रांतील गांव-गाडा लहानपणापासून पाहण्यांत येत असल्यामुळे त्याचे विचार फार दिवसांपासून मनांत घोळत; आणि हें नको ते पाहिजे असे वाटे. परंतु अमुक गोष्ट वाईट आहेशी वाटते ती खरोखरीच वाईट आहे किंवा आपल्याला ती चांगलीशी उमजली नाहीं स्हणून वाईट दिसते ही शंका राहून राहून येई व दटावून सांगे क ‘थांब,पुनः ती पहा व तिचा विचार कर. कविकुलगुरु कालिदासाने म्हटल्याप्रमाणं “विकारं खलु परमार्थतोऽज्ञात्वानारंभः प्रतीकारस्य.” ज्या ठिकाणीं व ज्या लोकांत सुधारणा करावयाच्या त्यांविषयी शक्य तितकी ऐतिहासिक, सामाजिकधार्मिक, सांपत्तिक, राजकीय वगैरे हरतऱ्हेची माहिती हस्तगत केल्यावांचून पूर्वग्रह, परंपरा व चालू वहिवाट ह्यांच्या बसल्या घडीवर उपायचिंतन कसें होईल ? अशा मार्गाने पहिले पहिले पुष्कळ विचार पालटत गेले; आणि विशेषतः गेल्या पंधरा वीस वर्षांच्या श्रवणाने अवलोकनाने, मननाने आणि अनुभवाने त्यांपैकीं जे मुकरर झाले, त्यांचे व्युत्पत्ति, इतिहास, समाजशास्त्र आणि म्हणीं वगैरेंवरून सुचणाऱ्या नानाप्रकारच्या प्रचलित समजुती इत्यादींच्या धोरणानं रेखाटलेले सोपपत्तिक शब्दप्रतिबिंब आपणाला सादर करीत आहें.

प्रकृत पुस्तकाच्या अवघ्या विषयांचे आकलन साधारण मनुष्यानं करू म्हणणें म्हणजे थोडें फार वाऱ्याची मोट बांधण्याची आकांक्षा धरण्यासारखेच आहे. गांव-गाड्यांत काय एक येत नाहीं? त्या सर्वांचा यथाक्रम, यथाभाग व यथान्याय समावेश करणे मला तरी दुर्घट वाटले. त्यांतून गांव-गाडा प्राचीन कालीं जरी आंखून भरला असला तरी पुढे तो तसाच धुराड, उलाळ, एकार वगैरे न येतां आपल्या मूळच्या ढाळावर रेखला चालला आहे असें बिलकुल नाहीं. उलट जागा, प्रमाण, तोल इत्यादि न पाहतां जशी रीघ मिळाली तशी त्यांत भरती होतच गेली,