पान:गंगाजल (Gangajal).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ८१ की, वाईट वाटण्याचे कारण खरोखरच त्यांना राहणार नाही. म्हातारी माणसे मेली, म्हणजे तरुणांना त्यांच्या जागांवर बसता येईल. तेथून उचकटावयाला प्रयत्न करावे लागणार नाहीत. जुने पुढारी मेल्यामुळे नव्यांना भरपूर वाव राहील. म्हाताऱ्यांचासुद्धा या योजनेत फायदा आहे, हे विचाराअंती त्यांना दिसून येईल. जास्ती जगल्यामुळे वरवर दिसावयाला म्हातारी माणसे जरी अधिकाराच्या पदांवर असली, तरी खालच्या पिढीच्या सतत प्रहारांमुळे त्याची मने हबकून गेलेली असतात. ती जिवंतपणीच मेलेली असतात: हृदयातील व्यथा लपवून वरवर हसत असतात; जिवंतपणाचे सोंग घेऊन वावरत असतात. ह्या असल्या जिवंत मरणापेक्षा खरोखरीचे नाहीसे झालेले काय वाईट? माझे विचार कुठे भरकटले असते कोण जाणे! पण मला शब्द ऐकू आले, “बाई, कॉफी आलीय, पिता ना?" एकच कप कॉफी आली होती. “तू नाही घेणार?" मी विचारले. "मला नकोय आज." मी मुकाट्याने कप तोंडाला लावला. कॉफी छान गरम होती. पणआज नेहमीपेक्षा कडू लागली. का बरं? मी वरती पाहिले. माझ्या तरुण मदतनिसाचा चेहरा नेहमीप्रमाणेच प्रसन्न, निर्व्याज व निरागस होता. १९६९