पान:गंगाजल (Gangajal).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ३e भजन ऐकू येणे हा अनुभवच नवा होता. म्हणून इतर नव्या अनुभवांच्या जोडीला झोप येऊ न देण्यास त्यानेही मदत केली. भजन थांबले. सगळीकडे सामसूम होती. एवढ्यात खोलीच्या खालीच कसलातरी खुळखुळण्याचा आवाज ऐकू आला. मी ताडदिशी उभी राहिले, आणि खिडकीतून डोकावून पाहिले, तर घरचा कुत्रा बागेत हिंडत होता; त्याच्या गळ्यातल्या पितळी बिल्ल्याचा आवाज ऐकू येत होता. थोड्या वेळाने परत शांतता पसरली. पण त्या शांततेतही कुठेतरी काहीतरी लहानसहान आवाज येत होते. कौलांवरून काहीतरी सरपटत गेले. वाऱ्याने बाहेरचा पाचोळा उडाला. ही शांततासुद्धा काहीतरी नवीन होती. तिचा स्तब्धपणा किंवा तिचा आवाज हे दोन्ही माझ्या ओळखीचे नव्हते. आणि ते काय असावे बरे? - असे नसते प्रश्न मन विचारीत होते. __ लांब एका विचित्र आवाजाला सुरुवात झाली. आवाज एकदम मोठा झाला आणि दीर्घ हाळी देऊन थांबला. आवाज मानवी नव्हता; बऱ्याच जणांनी मिळून केला होता. थोड्या वेळाने परत तोच आवाज झाला. आणि माझ्या लक्षात आले की, ती कोल्हेकुई होती. येथे शेजारी उसाची शेते पुष्कळ अन रात्री कोल्ह्यांची धाड उसावर पडायची. हा आवाज कसला, हे ओळखून त्याला नाव दिल्याचे मला समाधान वाटतेय, इतक्यात बाहेरच्या झाडावरून हऽ हऽ हऽऽ असे ऐकिले. मी पुटपुटले, 'हे हमण!' ही जागा म्हणजे बाहेरून येणारा प्रत्येक संदेश ग्रहण करण्याची इंद्रियांची तत्परता आणि थकलेपणा यांचे द्वन्द्व. किती वेळ चालले असते, कोण जाणे! पण शेजारच्या खोलीतून आवाज आला... ठणऽ ठणऽ ठणऽऽ. हा नेहमीचा व्यवहारातला, दाट ओळखीचा घड्याळाचा आवाज. मनावरचा ताण एकदम गेला. कितीचे ठोके पडणार, हे मी मोजणार होते. पण ते बंद पडायच्या आतच मला झोप लागली. मी स्वप्नात वावरत होते आणि कालपरवाच्या अनुभवापासून तो जागत्या मनाला अज्ञात असलेल्या भूतकाळात आणि निरनिराळ्या स्थळांतून मी भटकत होते. दगडांच्या वाटोळ्या गडग्यात मी उभी होते. जिकडे पाहावे तिकडे काही दूर, काही जवळ अशी दगडाची वाटोळी कुंपणे पसरलेली होती. खाली नदी दिसत होती. काहीतरी मासेमारीच्या गोष्टी चालल्या होत्या. एवढ्यात मला एकदम गणपतीचे देऊळ दिसायला लागले. सभामंडपात पेशवे शेवटच्या घटका मोजीत पडले होते. भोवताली कोणकोण म्हणून