पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागा पकडण्याची घाई त्या समाजाला झाली होती. नेहरूच्या औद्योगिकीकरणाच्या संकल्पनेला पूर्वी एकदा मी "चैत्रगौरी" औद्योगिकीकरण असे नाव दिले आहे. चैत्रात शहरातील विशेषतः, ब्राह्मण समाजातील गृहिणी घरी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. आलेल्या सुवासिनींना कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हे दोनच पदार्थ द्यायचे असतात, घर श्रीमंताचे असो की गरिबाचे असो. मग अहमहमिका लागते ती गौरीच्या सजावटीची. गौर मखरात बसवली म्हणजे तिच्या भोवती सजावटीला काहीही ठेवले तरी चालते. घरात जे जे म्हणून दाखवण्यासारखे असेल, अगदी पोरांची खेळणीसुद्धा तेथे ठेवली जातात. शेजाऱ्यापाजाऱ्याकडून उसनवारी करूनसुद्धा शोभेच्या वस्तु गौर सजवण्यासाठी आणल्या जातात. वेगवेगळे उद्योगधंदे बाहेरून भारतात आणून इथली "चैत्रगौर" सजवण्याचा घाट नेहरूनी घातला. पण गौर सजली म्हणजे काही घरात लक्ष्मी येते असे नाही.

 शेतकऱ्यांच्या लुटीतून भांडवल निर्माण करावे. त्यातून परदेशी तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री यांची आयात करावी. कोट्यावधी लोक बेरोजगार असताना मोठ्या भांडवली खर्चाचे व थोडे रोजगार देणारे उद्योगधंदे काढावे, या कारखान्यांनी तयार केलेला माल विकत घेण्याची देशातील बहुसंख्य हीनदीनांची ताकदच नसल्यामुळे कारखानेही संकटात यावेत, मग बळेच रडतराउतांना घोड्यावर बसवावे, त्यांनी केलेल्या मालाची निर्यात करायचा प्रयत्न करावा, म्हणजे परदेशातून आणलेल्या उधार-उसनवारांची थोडी तरी फेड करता येईल. एवढ्याने भागले नाही तर, नोटा छापून आणि परकीय कर्जे घेऊन का होईना, देशातील उद्योगधदे वाढवण्याची शर्थ नेहरूव्यवस्थेने केली. ही अशी अजागळ व्यवस्था निदान पन्नास वर्षे टिकलीच कशी हे एक मोठे आश्चर्यच आहे. याची तीन चार महत्त्वाची कारणे आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात होत होती. ग्राहकोपयोगी वस्तू तयार करून खपवण्यापेक्षा ग्राहकोपयोगी वस्तू तयार करण्याचे कारखाने विकण्यात त्यांना जास्त स्वारस्य तयार झाले होते. औद्योगिकीकरणाच्या नावाने जिभल्या काढीत आलेल्या तिसऱ्या जगातील राष्ट्रांना हे जुने तंत्रज्ञान देऊन टाकण्यात त्यांची सोयच होती. जगातील शीतयुद्धाच्या तणावाने

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने