पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवृत्तीच नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हिंदुस्थान शेकडो वर्षे मागे आहे. केवळ वीस वर्षांच्या अवधीत परदेशी तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, औषधे विनाखर्च वापरायला मिळाली तर परदेशी शास्त्रज्ञांविषयी सर्वसामान्य जनांच्या मनात कृतज्ञताभावच असेल.
'सीताशेती'तील संशोधनालाही संरक्षण
 या पलीकडे जाऊन संशोधन ही एकतर्फी वाहतूक आहे अशी शेतकऱ्यांची भावना नाही. परदेशी संशोधन भारतात येईल त्याप्रमाणेच भारतातील शोध परदेशात जातील असा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आहे. हे संशोधन संशोधनशाळेत होणार नाही, कृषिविद्यापीठात होणार नाही, भारतीय उद्योजक तर त्या दिशेने प्रयत्नही करणार नाहीत; पण भारतीय शेतकरी संशोधनात पुढाकार घेऊ शकतो. महाराष्ट-तील द्राक्ष शेतकऱ्यांनी याचा सज्जड पुरावा पुढे ठेवला आहे. तेव्हा बौद्धिकसंपदेचा हक्क म्हणजे केवळ बोजा नसून ते आज ना उद्या फायद्याचे कलमही ठरेल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या बाबतीत त्यांची परिस्थिती इंडियातील परभृत बुद्धिजीवींपेक्षा फार वेगळी आहे.
 पण, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वेगळाच आहे. सूक्ष्म जिवाणू आणि संबंधित शास्त्रांमधून शेतीच्या नव्या प्रगतीचा रस्ता जातो ही कल्पना शंकास्पद आहे. शास्त्रज्ञांनी नवीन नवीन तंत्रांनी, नवीन नवीन वाणे तयार केली म्हणजे ती स्वीकारण्यापलीकडे शेतकऱ्यांना गत्यंतरच राहाणार नाही ही कल्पनाही भ्रामक आहे. शेती कारखानदारी पद्धतीने करण्याची पाश्चिमात्य आणि समाजवादी देशांतील कल्पना दिवसेंदिवस अनाकर्षक होत आहे. त्याऐवजी, निखळ विज्ञानावर आधारलेली नवीन शेती हळू हळू अंकुरत आहे. अशा शेतीच्या उत्पादनाला एक वेगळी आणि किफायतशीर बाजारपेठ तयार होत आहे. 'सीताशेती' हा या दिशेने सुरू केला एक प्रयोग आहे.
शेतकरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वागतास सज्ज

 शेतकऱ्यांना बागुलबुवा दाखवून बुद्धिसंपदेची तस्करी करण्याचा कार्यक्रम चालविणे यापुढे शक्य होणार नाही. शेतकरी दोन्ही हात उभारून नव्या खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत करायला सिद्ध झाला आहे. या खुल्या व्यवस्थेत काळ्या इंग्रजांनी आजपर्यंत वापरलेली सर्व शस्त्रे मोडून पडणार

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
४७