पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकाशकाची भूमिका


 शरद जोशींचे विचार शेतकरी संघटनेच्या चौकटीबाहेरील सामान्य वाचकांपर्यंत पोचावेत हा या पुस्तकामागचा मूळ हेतू. यापूर्वी 'स्वातंत्र्य का नासले?' या नावाने त्यांचा लेखसंग्रह आम्ही प्रकाशित केला होता. त्यांच्या लेखांची संकलनं प्रसिद्ध करण्याचा प्रकल्प आमच्या प्रकाशनाने हाती घेतला असून त्या मालिकेतील हे दुसरे पुस्तक.
 १९९१ पासून मुक्त अर्थव्यवस्थेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणि १९९५ मध्ये भारत या करारात सहभागी झाला. बहुतांश लोकांची या व्यवस्थेकडे बघण्याची दृष्टी संशयाची होती. शरद जोशींनी मात्र सुरुवातीपासून जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पुरस्काराची ठाम भूमिका घेतली. त्यांच्या विचारांचं द्रष्टेपण आज जाणवत आहे. 'शेतकरी संघटक' या पाक्षिकातून त्यांनी याविषयी सातत्याने लिखाण केले. १९९१ पासून ते १९९८ पर्यंत त्यांनी लिहिलेल्या अर्थविषयक, जागतिक व्यापारविषयक लेखांचा समावेश या संकलनात केला आहे. या लिखाणाला पूरक अशी 'स्वतंत्रतेची मूल्ये' ही लेखमालिका परिशिष्टात देण्यात आली आहे.
 'प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' या लेखसंग्रहात शरद जोशींनी नेहरुवादी आर्थिक नीतीच्या दारुण अपयशाचा समाचार घेतला होता आणि लोकशाही समाजवादाच्या नावाने सरकारने राबवलेल्या शेतकरी-उद्योजक विरोधी धोरणाचे पितळ उघडे पाडले होते. त्यानंतर येणारा हा लेखसंग्रह २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप खुलेपणाने मांडून भावी काळात उत्पादक-उद्योजक यांना उपलब्ध होणाऱ्या उत्कर्षाच्या वाटा अधोरेखित करतो.
 'शेतकरी संघटक'चे संपादक श्री. सुरेशचंद्र म्हात्रे, विनय हर्डीकर व अनंत उमरीकर या ज्येष्ठांची मदत या पुस्तकासाठी मोलाची ठरली आहे. या लेखांच्या निवडीचे श्रेय डॉ. शाम अष्टेकर व अजित नरदे या मित्रांना जाते.

- श्रीकांत उमरीकर