पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एखादी गोष्ट करायची म्हटली की ते चिकाटीने टोकाने जाऊन करतात. प्रसंगी गांधीवादी मार्गाने ते उपोषण करतील, लोकशाही मार्गाने निवेदने देतील, भेटतील, समजावतील पण कोण झोपेचे सोंग घेऊ लागला तर कायद्याचा बडगाही दाखवायला ते कमी करत नसतात. वारंवार डोळ्यात पाणी आणून बोलणारा हा कार्यकर्ता मग असा कणखर होतो की, ज्याचे नाव ते. या कार्यकत्र्यांस अपयश माहीत नव्हतं.
 महिलाश्रमाचे कार्य करत असतानाच्या काळात त्यांचं घर हे महिलाश्रमातील मुलींचं ‘हक्काचं माहेर' होतं. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. कान्ता कामत या मुलींचं बाळंतपण, औषधोपचार हवं नको सारं पहायच्या. कामतसाहेबांना प्रत्येक मुलीची माहिती असायची. मुलींच्या लग्नात ते कन्यादान अगदी मनापासून करायचे. पदरी अनेक मुली असूनही या अनाथ मुलींबद्दलची त्यांच्या मायेत मी कधी दिखावा अनुभवला नाही. एका मुलीचं लग्न यशस्वी झालं नाही म्हणून जन्मदात्या बापाप्रमाणे भांडून पोटगी घेणारा मुलीचा बापही मी कामत साहेबांमध्ये पाहिला आहे.
 कामत साहेबांमधला साहेब' गेली पंचवीस वर्षे मी थाट नि रुबाबात पाहिला आहे. त्यांचा ‘साहेबी आलेख' मी कधी खाली आलेला पाहिला नाही. फोनवर
 बोलायची त्यांची ऐट केवळ साहेबी...
 ‘बोलाऽऽ!'
 ‘कुठून मशिदीतून की मठीतून?'
 “काय खबर?'
 अशी पृच्छा करणा-या फोनवरच्या संवादात आपुलकीही असते. अलीकडे त्यांना ऐकू कमी येते. त्यांचे मित्र आर. जे. शहा कमी ऐकू आल्याने निराश झालेत. पण कामतसाहेबांनी कमी ऐकू येण्याची अपवादात्मकही कधी तक्रार केली नाही. तक्रार म्हणजे निराशा, निष्क्रियता, नकार असे त्याचे जीवन तत्त्वज्ञान, त्यांचा साहेबी थाट बाहेर जसा तसा घरातही. बायको, मुले, मुली, सुनांचे पण ते ‘साहेब'च असतात.

 एखादी गोष्ट त्यांना सांगितली, पटली व त्यांनी करतो म्हटले की फत्ते झाली समजा, काम छोटं असो वा मोठं, ते करायचा त्यांचा कटाक्ष असतो. ते मध्यंतरी अमेरिकेला निघाले होते. तेथील अनाथ, निराधार मुलांचे संगोपन, पुनर्वसन विषयक माहिती घेऊन या म्हटल्यावर आपल्या दीड-दोन महिन्याच्या वास्तव्यातून किती तरी कात्रणे, वृत्तपत्रे, मासिके माझ्यासाठी घेऊन आले. निरीक्षणातील कितीतरी बारकावे सांगितले नि लक्षात आले,

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९६