पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कार्यक्रमाच्यानिमित्ताने त्यांच्याकडे जाणे होऊ लागले व परिचयाचे रूपांतर ऋणानुबंधात झाले. गेल्या पंचवीस एक वर्षात आम्ही उभयतांनी अनाथ महिलाश्रम, बालकल्याण संकुल, दाभाळे कर ट्रस्ट, वालावलकर ट्रस्ट, सारस्वत बोर्डिंग अशा अनेक संस्थांतून एकत्र काम केले. पण आम्ही खरे एकमेकांचे ऋणाईत झालो ते अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यामुळे. या कामात माणसाची पारख असलेला एक सहृदय कार्यकर्ता म्हणून जवळून मी त्यांना पाहिले, अनुभवले आहे.
 त्यांच्याच आग्रहामुळे मी अनाथ महिलाश्रमाचेही कार्य करू लागलो. बालकल्याण संकुलासारखे अनाथ महिलाश्रमाचे कार्य व्हावे म्हणून त्यांची कोण धडपड असायची. अपुरे मनुष्य व अर्थबळामुळे ते शक्य असायचे नाही. त्यांच्या मनाची तगमग ते अनेकदा बोलून ही दाखवायचे. या अवस्थते नू त्यांनी महिलाश्रमाचे विलीनीकरण करायचे ठरवून तो बालकल्याण संकुलाला दिला. त्यास अनेक महिला सहकार्यांचा विरोध होता. इकडे बालकल्याण संकुलातील काही मंडळी अशी जबाबदारी घेण्यास तयार नव्हती. पण तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्यामुळे ते शक्य झाले. या वेळी संस्थेस कर्ज होते. कुणीतरी मागे बोलल्याचे कळाल्यावर त्यांनी आपल्या ‘दाभोळकर ट्रस्ट' मार्फत भरघोस साहाय्य दिले. तत्त्व नि व्यवहाराची बेमालूम सांगड कशी घालायची हे समाजसेवक के. डी. कामत यांच्याकडून शिकावं त्यांच्याशिवाय चांगले कसब असलेला कार्यकर्ता मी पाहिला नाही.
 चांगल्या कार्यकर्त्यामागे ते आपली सर्व शक्ती अडचणीच्यावेळी उभी करत असतात. एकदा एखाद्या सहकाऱ्याला आपले मित्र मानले की, त्याच्याशी प्रतारणा करणे हा त्यांचा स्वभाव नाही. बालकल्याण संकुलाच्या अनेक वार्षिक बैठकीत ते अक्षरशः इष्ट मित्र, नातलगांसह घरचे कार्य म्हणून येताना मी अनुभवले आहे. अनाथाश्रमाची पाखरण त्यांनी 'घर' म्हणून केली. काही लोक त्याबद्दल टीकाही करायचे. आपल्या टीकाकारांना वादावादी न करता आपल्या कार्याने शह देण्याची त्यांची शैली शिकण्यासारखी आहे.

 के. डी. कामत हे व्यवसाय व शिक्षणाने अभियांत्रिक, पण त्यांची लेखनाची हातोटी निष्णात वकीलाला लाजवणारी. सार्वजनिक संस्था, संघटनांशी त्यांचा पत्रव्यवहार हे त्याचे ठळक उदाहरण. सारस्वत बोर्डिंगची स्टेट बँकेकडून मिळविलेली भाडेवाढ ही केवळ त्यांच्या वकिली लेखणीची कमाई होय.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९५