पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती शाळेला देऊन बिल्डरच्या घशात जाणारं मुलांचं क्रीडांगण त्यांनी वाचवलं. हिऱ्याच्या कुड्या, मोत्याच्या बांगड्या, चपलाहार, अशी स्वप्नं त्यांना पडली नाहीत. कधी काळी त्यांच्या दारी बांधलेल्या घोड्याच्या अंगावर शंभर-दोनशे तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. इतकं वैभव लाभलेल्या या राणीन साध्वीसारखं साध राहणं, असा घरंदाजपणा माणसात जन्मतःच असावा लागतो.
 शाळेतील बालवाडी त्यांनी सन १९४६ ला सुरू केली होती. पन्नास वर्षे उलटली तरी त्यांनी स्वतः आखून घेतलेली शिस्त, शिरस्ता कधी सोडली नाही. विनाअनुदान शाळेची खरी कल्पना माईसाहेबांनी राबविली. शाळा चालवताना त्यांनी आपली स्वायत्तता जपली. कुणा शासकीय अधिका-याला त्यांनी भीक घातली नाही. शिक्षकांना शिक्षणबाह्य उपक्रमात राबवायच्या शासनाच्या धोरणांचा त्यांनी कठोरपणे विरोध केला.

 प्रवेशात कुणाची लुडबूड त्यांनी चालू दिली नाही. जिल्हाधिकारी असो की मंत्री, त्यानं पालक म्हणूनच यायला हवं, असा त्यांचा आग्रह असायचा. एकदा एका जिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्याच्या मुलीस त्यांनी प्रवेश नाकारला. पण मध्येच बदली होऊन आलेल्या एका कनिष्ठ न्यायाधीशाच्या मुलास एवढ्याचसाठी प्रवेश दिला की, त्यानं न्यायाधीश म्हणून प्रवेश मागितला नव्हता. तत्त्व, मूल्य, कायदा या माईसाहेबांसाठी रोजच्या जगण्याच्या गोष्टी होत्या. अशा माईसाहेबांचं जीणं म्हणजे मला समाजानं आपली श्रीमंती गमावणं वाटतं. त्या नावाच्या श्रीमंत नव्हत्या... त्यांची संस्कार नि व्यवहाराची श्रीमंती त्यांनी पाळलेल्या टिपू कुत्र्यासही कळत असावी. त्यानं कधी माईसाहेबांची पाठराखण सोडली नाही. त्यांचा संस्कार, व्यवहार, आचार पाळणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरले. त्यांच्या वारसदार विश्वस्तांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९३