पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पाच लाख रुपये. ‘दिले, तुम्ही राणीसाहबे आहात. मुलांचं काम करता... कुणाच्या दारी तुम्ही जायचं नाही... मी जिवतं असेपर्यंत...' माईसाहेबांची शाळा पूर्ण झाल्यावर बापूंनी सांगितलेली भूमिका मला माईंचं मोठेपण स्पष्ट करणारी वाटते. बापूंनी कोल्हापुरात कापडाचं दुकान सुरू केलं होतं. तेव्हा राजघराण्यातल्या स्त्रिया मोटारींनी यायच्या... मोटारीत बसायच्या... दुकानदारांनी हेलपाटे घालत साड्या दाखवायच्या... मग बापू कसे हेलपाटे घालायला लावणार? माईसाहेबांनी आपल्या बँकेतील ‘मनी बॅलन्स'ची कधी चिंता केली नाही. त्यांना माणसांच वेड होतं. मॅन बॅलन्स' हाच त्यांचा ‘मेन बॅलेन्स' होता.
 शाळेतील मुलं' हा माईसाहेबांचा जीवनाचा नर्मबिंदू. त्यामुळे शाळेतील मुले मोठी झाली की त्याची पहिली पसंती ही ‘माईसाहेबांची शाळा'च असायची. मुलांच्या सवयी, गुण-दोष, अक्षरज्ञान, नाव सारं माईसाहेबांना ठाऊक असायचं. शिक्षकाच्या जीवनाचे मूल्यमापन हे त्यांच्या हाताखालून किती मुलं गेली यावर होत नसतं. किती हाती लागली हे महत्त्वाचं. माईसाहेबांचे कितीतरी विद्यार्थी उच्चविद्याविभूषित झाले. सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांवर त्या सारखंच प्रेम करायच्या. मुलं-मुली, असा भेद त्यांच्या लेखी नसायचा.
 माईसाहेबांना वाचनाची मोठी आवड. सोमवारी माईसाहेबांचा महाविद्यालयात फोन ठरलेला. रविवारच्या अंकातील वाचलेली ‘पुस्तक परीक्षण’, ‘नवं कोरं' सारखी सदरं त्यांना सतत अस्वस्थ करायची... पुस्तक हाती येईपर्यंत दहा फोन नि पंधरा निरोप... मी त्यांच्या सान्निध्यानं रोज वाचायला शिकलो. त्या स्वतः वाचत. पुस्तकं विकत घेत. शिक्षकांना सांगत. वाचनसंस्कृतीवर त्यांनी व्याख्यानं आयोजली. वाचन चोखंदळ असायचं. वर्तमानपत्रातलं मदतीचं निवेदन त्या वाचायच्या. मदत पाठवायच्या. संस्थांना पाठबळ पुरवायच्या. सामाजिक संस्थांत मुलांना पाठवायच्या. स्वतः जायच्या, विधायकतेचं मोठं वेड, आपल्याला मिळालेल्या पुरस्कार रकमेतून त्यांनी पुरस्कार सुरू केले. स्वतःचं वैधव्य त्यांनी महिलांना ‘सावली सन्मान पुरस्कार' देऊन व्यापक केलं.

 ‘बालसेवा पुरस्कार' देऊन ‘बालनाम सुखबोधाय'चा ध्यास जपला. माईसाहेबांचं निरिच्छ, निरपेक्ष जगणं मी जवळून अनुभवलंय. भैयासाहेबांना दत्तक घेतल्यावर त्यांनी आपलं सर्वस्व त्यांच्या नावे केलं. डोळे पाहेपर्यंत पसरलेली जमीन, इस्टेट मुलाच्या नावे करून संस्थान विलीनीकरण करारातून शासनाकडून येणा-या अवघ्या पाचशे रुपयांत त्यांनी राहणं, जगणं स्वेच्छेने स्वीकारलं. मध्यंतरी त्यांना माहेरच्या वाटणीतून काही रक्कम आली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९२