पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


इतके धर्मप्रभावी की घरी ब्राह्मणांची पण शिवाशिव चालायची नाही. बापूसाहेब प्रा. ना. सी. फडकेंचे विद्यार्थी. ते त्यांना राजाराम कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान शिकवायचे. त्यांच्या कानी त्यांच्या प्रेमाची कुणकुण गेली तेव्हापासून ते त्यांच्याशी थोड्या सावधपणे (खरे तर हातचे राखून!) बापूसाहेबांशी बोलायचे. मामांच्या (कर्मवीर भाऊराव पाटील) समजावण्यामुळे त्यांचे लग्न झाले.
 बापूसाहेब प्रारंभीच्या काळात राजकारणात सक्रिय होते. सन १९५५ च्या जवळपास त्यांनी राजकारण सोडून सामाजिक कामास वाहून घ्यायचे ठरवले. विशेषतः दलितांचे काम करण्याचे ठरवल्यावर या संदर्भा अनेक लढे, चळवळी, मोर्चे, सभा इत्यादींद्वारे हरिजनांच्या वतनांच्या जमिनी मिळवून देण्याकामी यश आले. फासेपारध्यांना पोलिसांच्या जाचातून मुक्त करता आले याचे त्यांना मोठे समाधान होते. या कामात लीलाताईंची मोठी मदत झाली. लीलाताईंच्या कामात मात्र आपण काही करू शकलो नाही,याची बापूसाहेबांना खंत असायची. त्यांच्या समाजकारणातील सक्रियतेच्या काळात अनेक हरिजनांना वैद्यकीय साहाय्य गरजेचे व्हायचे. अन्य डॉक्टरांचे तितकेसे साहाय्य झाले नाही. वॉनलेस हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सातवेकरांनी मोठी मदत केली. अशा अनके प्रसंगात लीलाताईंनी हरिजन रुग्णांना कितीतरी वेळा मनापासनू घरून डबे करून पुरविले. कार्यकर्ता म्हणून त्यांच्या घरात अनेकांची ये-जा, ऊठ-बस असायची. आल्यागेलेल्यांचे अतिथ्य हे एक मोठे कामच होते. ते लीलाताईंनी केले.

 सन १९५३ च्या दरम्यान बाई नोकरी करायला लागल्या. प्रथम तत्कालीन कोल्हापरू हायस्कूलध्ये त्या शिक्षिका होत्या. कोरगावकर ट्रस्टच्या नागाळा पार्क मधील विनय कुमार छात्रालयाच्या जागते पूर्वी ग्रामसेवाश्रम होता. तिथे एक छोटे गेस्ट हाऊस होते. त्यांचा पहिला स्वतंत्र संसार तिथे थाटला गेला. संन्याशाच्या संसारासारखा तो आटोपशीर होता. उत्पन्नाचे/ मिळकतीचे साधन म्हणजे लीलाताईंची नोकरी. पुढे प्रभाकरपंत कोरगावकरांनी जे. पी. नाईक यांचे साहाय्यक म्हणून बापूसाहेबांना मासिक १५० रुपयांचे साहाय्य सुरू केले. अर्थार्जन करता समाजसेवेला वाहून घेण्याचे त्यांनी ठरवल्यावर घरची सारी जबाबदारी लीलाताईंवर येऊन पडली. ती त्या जी शेवटपर्यंत पूर्ण केली. तेव्हापासून त्या बापूसाहेबांना दरमहा पैसे देत. ते देण्यात व घेण्यात कधी मानहानी झाली नाही. त्या काळात पूर्णवेळ सामाजिक परिवर्तनाचे काम उभयता करायचे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७६