पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण नाइलाज म्हणून १५ फेब्रुवारी, १९७२ ला डॉ. परांजपे यांचेकडे ऑपरेशन झाले. पण पुढे गुंतागुंत वाढत गेली. डोळा काढण्यावाचून गत्यंतर उरले नाही. अन् जगाला प्रकाश देणारा हा साहित्यऋषी स्वतः मात्र अंधार सोबती झाला. पूर्ण अंधत्व आले. तरी वि. स. खांडेकरांनी लेखन, वाचनाची आस सोडली नाही. प्रवास, फिरणे बदं झाले तरी घरी शतपावली चालायची. तशातच त्यांनी १९७५ चे कराडचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, ज्ञानपीठ पारितोषिक समारंभ व त्याप्रीत्यर्थ दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूरचे सत्कार समारंभ केवळ लोकांच्या प्रेमामुळे पेलले. ऑगस्ट १९७६ मध्ये त्यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे ढासळत गेली. ऑगस्टच्या शेवटी त्यांना मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. उपचार घेत असतानाच त्यांचे २ सप्टेंबर, १९७६ मध्ये दुःखद निधन झाले. त्यांची कोल्हापुरात 'न भूतो, न भविष्यति' अशी अंत्ययात्रा निघाली. त्यात मी एक पाईक होऊन अंतिम श्रद्धांजली अर्पण केली होती. मला खांडेकरांचा सहवास सन १९६३ पासनू लाभला तो त्यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून. नंतर त्याच शाळेत मी हिंदी शिक्षक झालो. त्या काळातही सतत भेटणं, बोलणं होत राहायचं. त्यांच्या आचार, विचारांचे व साहित्याचे संस्कार मजवर झाल्यानेच मी मूल्यनिष्ठ जीवन जगू शकलो, अशी माझी विनम्र धारणा आहे. त्यांच्या या ऋणाची परतफेड म्हणून शिवाजी विद्यापीठ व खांडेकर कुटुंबीय यांच्या मदतीने वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय सन २००४ मध्ये शिवाजी विद्यापीठात उभारू शकलो. सन २00१ ला त्यांच्या निधनास २५ वर्षे झाली. रजत स्मृती म्हणून त्यांच्या असंकलित व अप्रकाशित साहित्याचे संपादन केलं. कथा, कादंबरी, लघुनिबंध, आत्मकथा, वैचारिक लेख, मुलाखती, पटकथा संग्रह अशी १८ नवी पुस्तके प्रकाशित झाली. व्यक्तिचित्रे, भाषणे, विनोदी लेख वैनतेयचं लेखन अशी आणखी ७ पुस्तके प्रकाशित करून त्यांची रजत स्मृती पूर्ण होईल. हे चरित्र लेखनही त्यांच्या मजवरील संस्कारांचीच उतराई होय.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७३