पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यांनी स्पर्धा जाहीर करून एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सकारात्मक नाटक लिहिण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रकाशित केली. ती वि. स. खांडेकरांच्या वाचनात आली. त्या वेळी खांडेकरांना २५ रु. पगार होता. त्यांना नाटक लिहिण्याचा झटका आला. त्याच्या मुळाशी अर्थातच बक्षिसाचे प्रलोभन होते. स्पर्धा झाली. बक्षीसपात्र नाटक काही संयोजकांना मिळालं नाही. या परीक्षण मंडळात बेळगावचे नाट्यरसिक व मर्मज्ञ भाऊसाहेब सोमण होते. ते ‘किरात या टोपण नावाने त्या वेळी लिहीत. ते केशवसुतांचे मित्र व चाहते. त्यांना वि. स. खांडेकरांचे नाटक आवडले. त्यामुळे बेळगावचे नाट्यप्रेमी डॉ. के. वा. साठे व पु. ल. ओगले यांना ते रंगभूमीवर यावे असे वाटले. डॉ. के. वा. साठे यांचा नाट्यकला प्रसारक संगीत मंडळी, सांगलीशी संपर्क व परिचय होता. त्यांच्या शिफारशीवरून नाटक निवडले गेले. त्याचा पहिला प्रयोग सांगलीच्या सदासुख नाट्यगृहात १६ मे, १९२८ रोजी झाला. यात कमलाबाई कामत यांनी नायिका उषाची तर शि. ह. परांजपे यांनी प्रदोषची भूमिका केली होती. परांजपे त्या वेळी 'प्रेमसंन्यास'मध्ये गोकुळची भूमिका करत.

 हे नाटक पुस्तकरूपात प्रकाशित होईल असे वि.स.खांडेकरांना कधी वाटले नव्हते. पण खांडेकर सांगली हायस्कूलला शिकत असताना त्यांच्या पुढे-मागे वामन वासुदवे अतीतकर होते. ते बी. ए. होऊन विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयाचे आजीव सेवक होते. पुण्याच्या सदाशिव पेठेत संस्थेचा समर्थ भारत छापखाना होता. त्यांना वाटलं की, आपण हे नाटक प्रकाशित केलं तर संस्थेस चार पैसे मिळतील. म्हणून ते त्यांनी सचित्र प्रकाशित केलं. नाटकाचं नाव होतं 'संगीत रंकाचे राज्य' सन १९२८ ला प्रकाशित या नाटकाची किंमत होती १ रुपया. या नाटकास मुरूड जंजि-याचे बा. अ. भिडे यांची प्रस्तावना आहे. नटवर्य केशवराव दाते यांनी पुण्यात हे नाटक पाहून नाटकाची नायिका श्रीमती कमलाबाई यांच्या अभिनयाची प्रशंसा करणारे एक पत्र खांडेकरांना लिहून नव्या नाटकाची मागणी केली हाती. यावरून ‘संगीत रंकाचे राज्य' किती यशस्वी होते याची कल्पना येऊ शकते. खांडेकरांनी प्रतिसाद म्हणून त्यांना आपले ‘मोहनमाळ' नाटक पाठवल्याचे उल्लेख पत्रव्यवहारात आढळतात. केशराव दाते व खांडेकर यांच्यात सन १९२९ पासून १९७१ पर्यंत पत्रव्यवहार दिसून येतो. त्यातून केशवराव दाते खांडेकरांना नाट्यदोष दाखवित व मार्गदर्शन करत, असे आढळून येते. वि. स. खांडेकर केशवराव दातेच्या सूचनांचा आदर करीत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६३