पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साप्ताहिकासाठी 'वैनतेय' नाव वि. स.खांडेकरांनीच सुचविलं. हे नाव निवडताना त्यांच्यापुढे दोन गोष्टी होत्या. दक्षिण कोकण हा डोंगरांनी वेढलेला भूप्रदेश. त्या डागें राच्या खडकावर बसून सूर्याकडे टक लावून पाहणाच्या गरुडासारखा आपणास सामाजिक, राजकीय प्रश्नांचा वेध घेता आला पाहिजे. दुसरे म्हणजे मेघःश्याम शिरोडकर न. चिं. केळकर, शिवरामपतं परांजपे अशा गुरुंपासून वृत्तपत्रीय प्रेरणा घेऊन आलेले. त्यांच्यापुढे 'केसरी'चा आदर्श होता. केसरी म्हणजे सिंह. प्राण्यांचा राजा सिंह तर गरुड पक्ष्यांचा. त्यामुळे ‘वैनतेय' नाव निश्चित करण्यात आलं.
 ‘वैनतेय'चं ध्येय, धोरण, प्रतिबिंबित करणारा एक श्लोक ही खांडेकरांनी लिहिला होता. तो गरूडाच्या चित्राबरोबर प्रत्येक अंकाच्या डोक्यावर छापला जायचा. तो श्लोक असा होता-
  “वसे दास्यी माता, नयनसलिली मग्न विनता
   असे पंगू भ्राता, अहिकुलछले भीत जनता
  नसे साह्या कोणी, अमृत लपलें स्वर्ग भुवनी
  हसे माता आणी विहगपति ते शत्रु वधुनी"
 यातील ‘वसे दास्यी माता' हे भारतमातेच्या पारतंत्र्यास उद्देशून होते. “अहिकुल छलें भीत जनता'चा संबंध आपल्याच समाजाचा एक भाग दुस-यावर हुकूमत गाजवतो. स्वातंत्र्याप्रमाणे त्यापासून ही मुक्ती मिळावी असे ते सुचविणारे होते.

 वैनतेय साप्ताहिकाचा पहिला अंक २९ ऑक्टोबर, १९२४ रोजी प्रकाशित झाला. सावंतवाडीचे राजबहाद्दूर बापूसाहेब महाराजांचा राज्याभिषेक समारंभ याच दिवशी होता. त्यानिमित्त पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. १९२४ ते १९३२ या कालखंडात वि. स. खांडेकरांनी अग्रलेख, स्तंभ लेखन, स्फुटं, टिपणे तर लिहिलीच पण प्रसंगी बातमीपत्रेही लिहिली.‘समुद्रमंथन', 'गाजराची पुंगी', 'गाढवाची गीता', 'बहुरत्ना प्रसवा’,‘गाढवापुढे गीता’, ‘परिचयाची परडी, कणसाचे दाणे', 'रानफुले' ‘कल्पनातरंग' अशी विविध सदरे खांडेकरांनी लिहिली. ‘वाङ्मय विचार विभागाचे संपादन खांडेकर करीत. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा तत्कालीन अनेक प्रश्नांवर खांडेकरांनी अक्षरशः शेकडो पानं भरतील इतका मजकूर लिहिला. कधी स्वतःच्या नावाने कधी अनामिक तर कधी, विहंगम,आदर्श, कुमार इ. टोपण नावांनी. याशिवाय त्यांनी ‘वैनतेय'मध्ये कथा, लघुनिबंध, लेख, विनोदी साहित्य, नाट्यछटा, कविता असं अनेकांगी

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६१