पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पहिल्या पंधरा दिवसाचा पगार २० रु. हाती आला. नोकरी म्हणून केलेली ती पहिली कमाई होती. तिथल्या निसर्गानं खांडेकरांना भुरळ घातली. सुरुची बाग, भिके डोंगरी, मिठागरे, काजी सारं पाहताना शहरातून आलेला हा तरुण शिक्षक रोमांचित व्हायचा. तांबड्या मातीत रंगलेले जेमतेम गुडघे झाकणारे धोतर, धोतराला साजेसा तांबूस सदरा, वर जुना पुराणा कोट, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चांदीच्या काड्यांचा जाड काचेचा चष्मा, एका हातात छत्री तर दुस-या हातात पिशवी, पिशवीत पुस्तकं अशा वेशात खांडेकर मास्तरांचा सर्वत्र संचार असायचा.
 शाळेला स्वतःची इमारत नव्हती. इमारत बाधं कामासाठी त्यांनी निधी उभारायला सुरुवात केली. खांडेकर मास्तर, आप्पा नाबर, अन्य शिक्षक बाजार, जत्रांमधून फंडाची पेटी फिरवत. घरोघरी जाऊन खांडेकर प्रकृतीची पर्वा न करता उंबरे झिजवू लागले. सभा होत. जुना अनुभव लक्षात घेऊन विरोधही व्हायचा. पण खांडेकरांना ध्येयवादानं पछाडलं होतं. सन १९२५ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झालं. त्या वेळी शिक्षकांना ७५-८० रुपये पगार असायचा. पैकी प्रत्यक्षात निम्माच मिळायचा. त्या काळात प्रत्येक शिक्षकांने इमारत फंडास १००० रुपयांची देणगी देऊन आपली निष्ठा व्यक्त केली होती. त्या काळात इमारतीस २५००० रुपये खर्च आला होता. त्याचा सविस्तर जमाखर्च खांडेकरांच्या हस्ताक्षरात उपलब्ध असून तो शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात पाहताना खांडेकरांच्या समर्पण व त्यागाची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.

 शिक्षक म्हणून खांडेकर विद्यार्थ्यांना आईसारखा जीव लावत. त्यांच्या विचारांप्रमाणे आचाराचे संस्कारही विद्याथ्र्यांवर घडत. एकदा खांडेकर आपल्या एका विद्यार्थ्याला घेऊन सावंतवाडीला गेले होते. काम संपेपर्यंत रात्र झाली. सोबत खांडेकरांचे स्नेही होते. त्यांनी घरी आग्रहानं जेवण्यास नेलं. मित्र सनातनी होते. जातपात पाळायचे. त्यांनी विद्यार्थी जेवायला वेगळा बसवला. दारावरील पायरीवर शेणगोळा ठेवला. संकेत हा की भोजन झाल्यावर त्यानं आपली जागा सारवावी. खांडेकरांच्या हे लक्षात आलं. आपलं नि विद्याथ्र्यांचं जेवण होताच खांडेकरांनी शेणगोळ्यात हात घातला. मित्र खजील झाला. त्यानं प्रतिबंध केला पण विद्याथ्र्यांच्या डोळ्यात मात्र आपल्या शिक्षकांच्या आचारधर्म नि आदर्शामुळे पाणी आलं. असंच एकदा शाळेची सहल गेली होती. मुलगा समुद्रात बुडतो बघून खांडेकर मास्तरांनी समुद्रात मारलेली उडी त्यांच्या कर्तव्य व बांधिलकीची परिसीमा होती.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५९