पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आशा-निराशेच्या लपंडावातच कळलं की आपण ज्यांना दत्तक जाणार आहोत त्या सखाराम काकांना १४ अपत्ये झाली होती. एक विधवा मुलगी वारणाक्का वगळता सर्व निवर्तलीत चुलते अत्यवस्थ स्थितीत अंथरुणास खिळून आहेत.सावंतवाडीपासून सात-आठ मैलांवर असलेल्या नाणेली गावी त्यांचा मोठा जमीन-जुमला आहे तो सांभाळण्यासाठी त्यांना वारस हवाय. शिवाय ते अंधश्रद्ध होते. भुताखेतांवर त्यांचा विश्वास होता. आपल्या बोकांडी बसलेला समंध (भूत, पिशाच) उतरवायचा तर तरंगांनी (गुरव) सांगितल्याप्रमाणे दत्तकास पर्याय न राहिल्याने ते तयार झाले व दत्तक विधी १३ जानेवारी, १९१६ रोजी सावंतवाडीतील वडिलार्जित घरी पार पडून ते विष्णू सखाराम खांडेकर बनले.
 दत्तक विधान पूर्ण झाल्यावर खांडेकर पुण्यास शिक्षण घेण्यासाठी म्हणनू परतले. परतताना दत्तक वडिलांनी वाटखर्च देण्याचेही औदार्य दाखविले नाही. पुण्यास उतरले तेव्हा टांग्याने जाण्याइतपतही पैसे खिशात नव्हते. आता त्यांची स्थिती उपेक्षिताची झाली. ती दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच होती. 'न घर का ना घाट का दत्तक वडील रुष्ठ होते. दत्तक मुलानं शिक्षण सोडून शेती, सावकारी पहावी अशी त्यांची अपेक्षा होती. तिकडे आजोळी आजोबा वृद्ध झाल्याने त्यांचा हात आखडला होता. ते आई व भाऊ शंकरचा सांभाळ करायचे. या जबाबदारीमुळे व ते दत्तकपुत्र झाल्याने आजोळी परके झाले होते. आजोळच्या माणसांची अपेक्षा होती की आता दत्तक घरानं त्यांचं पहावं.
 खांडेकर हे विचित्र कात्रीत सापडले होते. दत्तक विधानानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली. अभ्यासातले लक्ष उडाले. परीक्षेला न बसल्याने टर्म बुडाली. मन रमवण्यासाठी वाचन व नाटक पाहणेच हाती होते. या काळात खांडेकरांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे 'वीरतनय' नाटक पाहिले. योगायोगाने प्रयोगाच्या वेळी गडकरी भेटले. त्यांना परीक्षेला न बसल्याचे कळताच ते रागावले. त्यामुळे त्यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मुंबईमार्गे कोकणात जाणे किफायतशीर होते. भाऊच्या धक्क्यावरून ते बोटीने वेंगुर्ल्याला आले. तेथून सारवट गाडीने त्यांनी सावंतवाडी गाठले.

 दत्तक घरी काकीची-बयावहिनीची हुकूमत चालायची. पण तिने कधी वैरभाव केला नाही. नवे गाव. मित्र नव्हते. पुस्तक माझा सखा' म्हणत खांडेकरांनी या काळात 'मूकनायक', ‘सुदाम्याचे पोहे', शेरेडनची नाटके वाचली. मोती तलाव, नरेंद्र डोंगर, चिवार टेकडी, आकेरीचे मेट, मळगावचे मेट ही निसर्ग स्थळे विरंगुळा बनली. सावतं वाडीच्या श्रीराम वाचनालयात वर्तमानपत्रे मासिके वाचणे जीवनक्रमाचा भाग होऊन गेला होता.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५५