पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सन १९१५ला शैक्षणिक वर्षामध्ये बदल करून जानेवारी डिसेंबर ऐवजी ते जून ते एप्रिल करण्यात आले. त्यामुळे सहा महिन्याची सुट्टी मिळाली. या सुट्टीचा फायदा घेऊन खांडेकरांनी रमणीरत्न' नाटक रचले. सांगलीतील या सुट्टीच्या काळात वासुदेव शास्त्री खरे यांना मिरजेत त्यांच्या घरी त्या नाटकाचे यथासांग वाचनही झाले. खरेशास्त्रींचा यावरचा अभिप्राय बोलका होता. ते म्हणाले, 'पोरा, तुझे वय लहान आहे. हे नाटक तू लिहिलेस यावर नाटकवाले विश्वास ठेवणार नाहीत.' या नाटकावर कोल्हटकर, गडकरी यांच्या कोट्यांचा प्रभाव स्पष्ट होता. ते लेखन म्हणजे पूर्वसुरींचं अंधानुकरण होतं. हे नाटक लिहिण्यामागे खांडेकरांचं एक भाबडं स्वप्न होतं. नाटक एखाद्या कंपनीला विकायचं व कॉलेज शिक्षणासाठी पैसे जमवायचे. पण खरेशास्त्रींच्यावरील अभिप्रायामुळे ते बासनात गेले.
 जून १९१५ ला खांडेकरांनी इंटरच्या वर्गासाठी फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा पण त्यांची मनःस्थिती ठीक नव्हती. पैशांची चणचण, नाटकांचे झपाटलेपण, वाचन वेड या सर्वांत विरंगुळा नि आधार होता तो राम गणेश गडकरी यांच्या सहवासाचा. त्या वेळी गडकरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. असेच एके दिवशी ते गडकरी यांचे बरोबर गंधर्व मंडळींच्या बि-हाडी गेले होते. बालगंधर्वांनी गडक-यांना सोबतच्या खांडेकरांकडे पाहून ‘मास्तर, हा बरोबरचा मुलगा कोणे?' म्हणून विचारणा केली. तेव्हा गडकरी मास्तर म्हणाले, ‘हा कोल्हटकरांच्या गादीचा वारस आहे. या वाक्याने खांडेकरांमध्ये साहित्यिक होण्याचे बीजारोपणच झाले.

 अशातच एक दिवस अचानक डिसेंबर १९१५ मध्ये पोस्टमास्तर असलेल्या मामांची तार हातात पडली. त्यात लिहिलं होतं, ‘ताबडतोब निघ. सावंतवाडीला जायचे आहे. दत्तक होण्यासाठी.' या तारेनं खांडेकर चक्रावून गेले. आपणास न विचारता दत्तकाचा घाट घातल्याबद्दल एकीकडे राग होता तर दुसरीकडे दत्तकामुळे आर्थिक अरिष्ट संपले अशी आशाही होती, पण ते भ्रमात नव्हते. वडिलांच्या जाण्याने आलेल्या पोरक्या जीवनात वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षांपासून खांडेकरांनी जन्मात प्रेम, करुणा, सहानुभूती या गोष्टी किती दुर्मीळ असतात, याचा अनुभव घेतला होता.नात्यांच्या रोज ताणत निघालेल्या विणीतून ते आकाशातले कोरडे ढग ओळखून होते. वडील गेल्यानंतर खांडेकरांनी काकांना मदतीचं पत्र आपल्या मामांच्या सांगण्यावरून लिहिलं होतं त्याचं साधं उत्तर न पाठवणाऱ्या काकांना- एका निर्दयी मनुष्याला आपण दत्तक जाणार या कल्पनेचं काहूर या युवकाच्या मनात घोंघावत होतं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५४