पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पैकी गणेश आत्माराम खांडेकर वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या काकांना-सखाराम खांडेकर यांना सावंतवाडीस दत्तक गेल्याने विष्णू सखाराम खांडेकर झाला. तो दत्तक पुत्र म्हणजचे मराठीतील सुविख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर होय.
 वि. स. खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ रोजी सांगली येथे त्यांच्या आजोळी झाला. गणपतीच्या देवळातच त्यांचं घर होतं. तिथं जन्म झाला म्हणून त्यांचं नाव गणेश ठेवलं गेलं. ते आपल्या वडिलांना दादा म्हणत. ते मुन्सफ होते. नोकरीत फिरती असायची. त्या वेळी सांगलीत आलेल्या एका अॅडमिनिस्ट्रेटरशी त्यांचं बिनसलं. मुन्सफाची नोकरी सोडून ते सब-रजिस्ट्रार झाले. त्यांचं घर सुखवस्तू होतं. कपडा-लत्ता, खेळणी, खाऊ मिळाला नाही, असं कधी झालं नाही. घरी मोलकरीण, स्वयंपाकी होती. वडिलांची थोरा-मोठ्यांत ऊठ-बस होती. त्यांची मुलांवर माया होती.
 गणेश शेजारच्याच मंडईमागील शाळेत जाऊ लागला. तिसरीत गेला नि त्याचा खोडकरपणा कमी झाला. तो अभ्यास करू लागला. चौथीत दुस-या क्रमांकाची तीन रुपयांची शिष्यवृत्ती पटकावून त्यानं आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली. त्याला कीर्तनपुराणाचा नाद होता. हा देवळात घर असल्याचा परिणाम. तो बारा-तेरा वर्षांचा झाला असेल (सन १९११), त्याला वाचन व क्रिकेटचा छंद जडला. घरी वडील आजारी असत. त्यांची शुश्रूषा तो मनापासून करायचा. या आजारातच वडिलांचं निधन ११ ऑक्टोबर, १९११ला झालं. पोरकेपणातून त्याला नाटकाचं वेड लागलं. त्या काळी सांगली संस्थानात नाटकाचं मोठं वेड होतं. विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, खाडिलकरांसारख्या नाटककारांची ही नगरी महाराष्ट्राची नाट्य पंढरीच मानली जायची. 'शारदा', ‘भाऊबदं की’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यू' सारखी नाटकं गणेशनी बालपणीच पाहिली. 'शापसंभ्रम', 'शारदा'मधील पदे त्याला तोंडपाठ होती. एकदा ती देवलांना म्हणून दाखवून त्यानं त्यांची शाबासकीही मिळविली होती.

 गणेश पंधरा वर्षांचा असेल. अभ्यासात हुशार तर होताच पण अभ्यासापेक्षा वाचनाचे वेड मोठे. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी', दाभोळकर ग्रंथमालेतील स्पेन्सर, मिल इ., हरिभाऊ आपटे यांच्या कादंब-या, शनिमाहात्म्य, नवनीत, वामन पंडित, मोरोपंत यांचे काव्य केशवसुतांची कविता, त्यानं अल्पवयात वाचल्या. वाचनाची त्याची भूक बकासुरासारखी होती. त्याचं वाचन वावटळीसारखं होतं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५१