मल्याळम भाषेत तर त्यांचे समग्र साहित्य अनुवादित झाल्याने त्या भाषिकांना खांडेकर आपल्याच भाषेतील लेखक वाटतात. मराठी भाषा व साहित्यास ज्ञानपीठ पारितोषिक पहिल्यांदा मिळवून देऊन खांडेकरांनी आपल्या साहित्याचं राष्ट्रीयत्व सिद्ध केलं. अशा खांडेकरांचं समग्र, सुबोध जीवन चरित्र ही मराठी साहित्यातील पोकळी होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न काळाची गरज होती. हा लेख म्हणजे खांडेकर व्यक्ती आणि वाङ्मयाचा अन्वयार्थ होय.
बळवंत खांडेकर हे खांडेकर कुटुंबाचे ज्ञात पूर्वज होत. त्यांचे एक भाऊही होते. विष्णुशास्त्री त्यांचे नाव. हे कुटुंब मूळचे सावंतवाडीचे. तिथल्या भटवाडीत आजही या कुटुंबाच्या रहिवासाच्या पाऊलखुणा स्थावराच्या रूपात साक्ष देतात. पैकी बळवंतराव खांडेकर हे वकिली करण्यासाठी म्हणून कर्नाटकातील हुबळी येथे गेले व तेथे स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. मुलाचे नाव आत्माराम. तो १५-१६ वर्षांचा असताना कालॅऱ्याने वडिलांचे म्हणजे बळवतं रावांचे निधन झाले. व्यवसायाशिवाय तिथे या कुटुंबाची मिळकत नसल्याने आत्माराम आपल्यासह दोन अनाथ बहिणींना घेऊन पैतृक गावी सावंतवाडीस आला. तिथे परतल्यावर आपल्या काकांशी म्हणजे विष्णुशास्त्रींशी संपत्ती हक्कावरून मतभेद झाले. तो भरल्या पानावरून उठला तो तडक सांगलीस आला. त्या काळी सांगली, कोल्हापूर या तत्कालीन घाटमाथ्यावर परूळेकर, बावडेकरांसारखी। कुटुंबे कोकणातून येऊन स्थिरावली होती. कोकणातून येणा-यांचे ते आधार बनत. इंग्रजी चांगलं असणा-यांना लगेच नोक-या मिळत. कोल्हापूर, सांगली, मिरज, कुरुंदवाड, जमखंडी इ. संस्थानिकांच्या राजधानीत त्या वेळी पोलिटिकल एजंटस्च्या कचेच्या असत. त्यांना सनदी कामासाठी मुन्सफ लागायचे. आत्माराम सांगलीस येऊन ओळखीच्या आधारावर शिकला, वकील झाला व मुन्सफ बनला.
१८५७ च्या बंडानंतरचा तो काळ होता. सांगली संस्थानात तात्यासाहेब पटवर्धनांचे राज्य होतं. बाबाकाका माईणकर हे दरबारी पुराणिक होते. ते गणपतीच्या देवळालगतच रहात. त्यांची सर्वांत धाकटी कन्या होती सुंदरी. ती उपवर होताच संस्थानातील आत्मारामपतं या उमद्या मन्सुफाचं स्थळ योग्य वाटून त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर वधूचे नाव 'रमाबाई' ठेवण्यात आले. आत्मारामपतं व रमाबाई यांचं कुटुंब सुखावलं. त्यांना तीन मुलं झाली. बळवंत, गणेश आणि शंकर.