पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/175

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आलेले श्रोते निराश होणार. काय करायचं! मग या कवींच्या रचना ऐकवायचं ठरलं. ही कल्पना अविचीच. लगेच तो कैफींची ‘कैफियत' कॅसेट घेऊन आला. त्या कवी संमेलनात मिरवत मी होतो, अवी मात्र पडद्यामागे धडपडत होता. एक कार्यकर्ता म्हणून आयत्या वेळी काय होऊ शकेल याचं त्याला पुरतं भान असायचं. माईक जोड, गाद्या घाल, पडदा लाव अशी कोणतीही काम करणं त्याला कमीपणाचं वाटलं नाही. अवी जाण असलेला अबोल परंतु संवेदनशील कार्यकर्ता होता. त्याला माणसांची चांगली पारख होती. माणसाचं पाणी जोखायचं जन्मजात कसब त्यात होतं. कवी संमेलनातील माझी यशस्वी खेळी बघून श्रमिक प्रतिष्ठानचा हिला सांस्कृतिक कार्यक्रम 'श्रमिक शाहिरीचा यळकोट'चा भंडाराही उधळायची जबाबदारी माझ्यावर आली. कोणतं शिवधनुष्य कुणाच्या हाती द्यावं याची पारख वडिलांप्रमाणे अवीसही चांगली होती. या यळकोटाच्या जागरात पण कार्यकर्ता म्हणून अवीने घेतलेले, उपसलेले कष्ट आज तो आपल्यात नसताना मला अधिक अस्वस्थ करतात. कारण त्या कष्टामागे विचार, श्रद्धा होती. आपला सूर्योदय तो जाणून होता. आपल्याला 'पुढारी' व्हायचं नाही, 'नेता' व्हायचं आहे याची त्याच्या मनी पक्की खूणगाठ होती. अवीच्या मागं माणसांचं मोहोळ असायचं. कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचं विलक्षण कौशल्य अवीत होतं. अवीच्या चरित्राचं एक वेगळेपणं होतं. तो राज्य पातळीवरील कामगाराचं नेतृत्व करणाच्या कॉ.गोविंद पानसरेंचा मुलगा.आपलं नाव,आपली ओळख त्यानं ‘अवी पानसरे' या दोन शब्दात ठेवली होती. आयुष्यभर रिकाम्या जागा ‘बाप कमाईवर नाही तर ‘आप कमाईवर भरायच्या असतात हे तो पुरेपूर जाणून होता. अवीनं स्वकर्तृत्वावर आपलं जीवन फुलवलं होतं. आई -वडिलांच्या विचार, संस्काराची घट्ट वीण अवीला मिळाली होती.

 आपल्या विचारांवर तो ठाम असायचा. बाबांशीपण मतभेद असेल तर तो व्यक्त करण्याचं बळ अवीनं कमावलं होतं. तो शिस्तप्रिय होता पण कामाच्या भाऊगर्दीने त्याला हैराण करून सोडलं होतं. कॉम्रेड गोविंद पानसरे अलीकडे राज्यभर फिरत असायचे. कार्यक्रम ठरवायचे नि त्यांना परगावी जाणं भाग असायचं. अवी त्यांचं सारं शिरावर घ्यायचा. त्यांची उणीव भासू द्यायचा नाही. पस्तीस वर्षांच्या जिंदगीत पन्नाशीचं प्रौढत्व प्रयत्न साध्य होतं खरं, पण ते आलं होतं विविध कार्यानुभवामुळे. नेता व्हायचं तर माणसांत मिसळायला हवं, हे तो ओळखून होता. पण यात हेरगिरी, डोळा ठेवणं, जाळं टाकणं असा धूर्तपणा नसायचा. ती त्याची सहजता होती. तो त्याचा स्थायीभाव होता.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७४