पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रमिक संघटक : कॉ. अविनाश पानसरे

 सन १९९७ ची गोष्ट. महाराष्ट्र फाऊंडेशन बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूरला व्हायचा होता. विंदा करंदीकरांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार होते. त्या निमित्ताने पुरोगामी कवींची फौजच कोल्हापुरात दाखल होणार होती. सारे कवी एकत्र येतात तर सान्यांचे एक संमेलन योजावं अशी टूम संयोजनसंबंधी बैठकीत निघाली. मराठी, हिंदी कवितेची जाण असलेल्यांनी या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करावं असं ठरलं. मग ही वीणा माझ्या गळ्यात आली. पत्रिका तयार करण्यापासून ते सूत्रसंचालनापर्यंत. संयोजकांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. या स्वातंत्र्याचा स्वैर आनंद लुटत असताना मला एक स्वतंत्र विचारांचा तरुण कार्यकर्ता भेटला. त्याचं नाव अविनाश पानसरे. संमेलन संयोजनाच्या पहिल्या बैठकीतच हा तरुण माझा जिवलग झाल्याचं आठवतं.
 पहिल्याच भेटीत मला लक्षात आलं की, अवीला साहित्याची चांगली जाण आहे. शिवाय तो पारंपरिक कम्युनिस्ट नाही. मोर्चे, मागण्या, संप, घेरावाच्या घेण्यात अडकलेल्या कामगाराची स्वतःची म्हणून ‘सांस्कृतिक भूक' असते अशी पक्की धारणा असलेला अवी, अस्तित्वाच्या लढाईबरोबर व्यक्ती विकासाची चढाई केल्याशिवाय हे साधणार नाही, याचं पुरतं भान त्याला होतं. अर्थवादात अडकून पडलेल्या कामगार वर्गाला शब्द, सुरांच्या झुल्यावर झुलवावं- जेणेकरून त्याचा शोषणाचा शोक, सोस विधायक मार्गांनी त्याचं उदात्तीकरण होईल याची त्याला खात्री होती. श्रम व संस्कृतीच्या संगमाने एक नवी श्रमसंस्कृती रुजवू पाहणारा तो एक द्रष्टा कार्यकर्ता होता.

 कवी संमेलनात आयत्या वेळी कैफी आझमी, नारायण सुर्वे यांचं यायचं रद्द झालं. पत्रिकेवर तर त्यांची नावं टाकलेली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७३