पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देण्यात येणारा ‘कै. निवासराव पोवार स्मृती पुरस्कार' बहाल करण्यात आला. खुर्द सरांना तो देण्याने त्या पुरस्काराचे वजन वाढले आहे. खुर्द सरांच्या मोठेपणाच्या किती गोष्टी सांगाव्यात? सावित्रीबाई फुल्यांवर त्यांनी छोटी पुस्तिका लिहिली. पण त्यांची मोठी अप्रकाशित माहिती त्यांच्या संग्रही आहे. ते काल परवापर्यंत श्रीमती सोनुबाई मानपुत्रे यांच्या घरी भाड्याने राहात. त्या एकट्या होत्या. त्यांनी आपलं राहतं घर खुर्द सरांच्या हवाली केले नि त्या निवर्तल्या. मालकांनी भाडेकरूला मालकीचे घर बक्षीस देण्याचा चमत्कार अन् तोही एकविसाव्या शतकात हे खुर्द सरांच्या सौजन्यशील आचारधर्माचीच पोचपावती. ते अॅड. गोविंद पानसरे यांना आपल्या कार्याचे ‘दिशादर्शक' मानतात. त्यांच्या शब्दात सांगायचं तर ‘पानसरेंचा आयएसआय मार्क' म्हणजे प्रयत्न निष्ठा कार्यास बळकटी देते अशी खुर्द सरांची धारणा. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अघोषित ‘सर्ववेळ सेवक होत. पक्षाच्या प्रबोधन मोर्चाचा, आघाडीचा पाठीचा कणा म्हणजे खुर्द सर. ‘सारं करून नामा निराळं रहाणं' शिकायचं असेल त्यांनी ते के. डी. खुर्द सरांकडूनच ते शिकायला हवं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६७