पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 पाचव्या वर्षी लोकच म्हणू लागले की “अहो गणपतीचा शाडू, रंग यांनी पण पाणी प्रदूषित होतं आम्ही नाही गणपती पाण्यात टाकणार.' प्रारंभीपासून कोल्हापूर महानगरपालिकेनं या मोहिमेस साहाय्य करून छ. शाहूंचा पुरोगामी वारसा जपला. पूर्वी पोलिसांची भूमिका विरोधी नसली तरी काखा वर करणारी होती. पोलीस दलास अद्याप छ. शाहू महाराजांचे पुरोगामीपण उमजल्याचं दिसत नाही. काळच त्यांना ते समजावेल.
 अलीकडच्या काळात के. डी. खुर्दानी अशाच चिकाटीने शाळाशाळातून होळी लहान करा, पोळी दान करा' उपक्रम राबवून पर्यावरणविषयक जागृती घडवून आणली. ही योजना राबवण्याच्या काळात ते एकदा बालकल्याण संकुलात आल्याचं मला आठवतं. आम्ही पोळ्या गोळा करू. तुम्ही घ्याल का? त्यांच्या तळमळीतील पारदर्शीपणामुळे मी त्या स्वीकारल्याचं मला आठवतं. आता आमच्या दहा-एक तरी शाळा नियमितपणे हा उपक्रम राबवतात.
 के. डी. खुर्द यांचं हे कार्य भूमिगत, अप्रसिद्ध चालत राहतं, म्हणून मला ते अधिक भावतं. त्यांच्या समाजसेवेचं एकंदरीत सूत्र माझ्या लक्षात आलंय. त्यांना समाज विसंगती दिसते. प्रश्न लक्षात येतो. ते भाषणं करत फिरत नाहीत. मुलं, विद्यार्थी हा त्यांच्या कार्याचा केंद्र असतो. मुलांत विज्ञाननिष्ठा रूजली तर उद्याचा भारत विज्ञाननिष्ठ बनेल अशी त्यांची दूरदृष्टी असते. ते विद्यार्थ्यांना प्रभावित करणारा वर्ग शोधतात. शिक्षक, पालक त्यांचे कार्यवाहक असतात. ते त्यांच्या दृष्टीने प्रभावी ‘कॅटॅलिक एजंट होत. मग ते विविध संस्था, संघटना, यंत्रणांना साद घालतात. के. डी. खुर्दीच्या चेह-यावर एक भाबडेपण असतं. बोलण्यात मार्दव असतं. समोरच्याला मोठेपण देण्याचं उमदेपण त्यांच्या उदारतेचं अपत्य होय. ते संस्थांचा गोफ विणतात. त्यांच्या समाजकार्यास पैसे लागत नाहीत. फक्त वेळ व श्रमाची अट असते. ते पत्रक तयार करतात. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघ, महापालिका, तरुण संघटना, नागरी संघटना सान्यांना ते वेठीस धरतात. 'थेंबे थेंबे तळे साचे' हे असतं त्यांच्या यशाचं रहस्य. मुख्याध्यापक संघ पत्रक छापून देतो. ते शाळा शाळांत स्वतः जाऊन पोहोचवतात. मुलांमार्फत ते हजारो घरात पोहोचतात व समाज नकळत त्यांच्यात गुंततो. ही किमया नावाने खुर्द (लहान) पण वृत्तीने बुद्रुक (महान) असलेले के. डी. खुर्दच करू जाणे!

 अशा या प्रसिद्धीच्या पडद्यामागे (खरं तर आड!) राहून गेली चार दशके कार्य करणाऱ्या के.डी.खुर्द यांना रोटरी क्लब कोल्हापूरमार्फत

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६६