पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शब्द एकाच प्रकारे अपभ्रंश होतात. तिखट, तेलकटपासून तिखाट, तेलकाट, दगड, डोंगरपासून दगुड, डोंगुर, केळ, तेल, केसपासून क्याळ, त्याल, क्यास! ज्या भाषा संशोधकांना मराठी ग्रामीण साहित्याचा भाषा विषयक अभ्यास करावयाचा असले त्यांनी खुर्दाना गाठावं. अगदी साहित्य अकादमी विजेते आमचे मित्र डॉ. राजन गवस यांनी पण तणकट' शीषर्क ‘तणकाट लिहायला हवं होतं. हे खुर्दीच्या भाषा भावामुळचे आम्हाला उमजलं. ‘श्येतात वंगाळ तणकाट माजलयं' हे मला कळू लागलं खुर्दीच्या अभ्यासामुळं.
 के. डी. खुर्द व त्यांचे सहकारी श्री. चौगुले इत्यादींनी १९८२ ते १९९० या काळात ग्रामीण भागात राबवलेल्या ‘जटा निर्मूलन मोहिमेमुळे देवदासी मुक्ती आंदोलनाला लोकाश्रय लाभला. गती आली. जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सर्वांनी मिळून ग्रामीण भागात देवदासी प्रथा रोखली. त्या काळी एकेकावेळी ५०-६० मुलींचं, स्त्रियांचं जटा निर्मूलन करून विक्रम केला. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड परिसरात तर या मंडळींच्या प्रयत्नांना विलक्षण यश लाभलं. पुढे खुर्द सरांनी या सर्वांचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की, मुलींचे मानेवरचे केस हे उवांचे अभयारण्य आहे. त्यांनी शाळाशाळांत जाऊन त्या काळात ‘बॉबकट' अभियान राबवलं, रुजवलं. पुढे तर गावच्या न्हाव्यांच्या बायका या कामात सहभागी झाल्या नि केसांच्या स्वच्छतेसंबंधी ग्रामीण भागात लोकजागृती आली. अगदी इंग्लंडला पण ‘बॉब कट' हा हिवाळ्यातील सहा महिने अंघोळ करू न शकणाऱ्या तपमानातील स्वच्छतेच्या विचारातून जन्माला आला. 'बॉबकट' ही 'फॅशन' नसून तो स्वच्छतेचा ‘शॉर्टकट' आहे. केस विंचरणे, स्वच्छ करणे, निगा राखणे यातील अकारण जाणारा वेळ वाचवणारा आहे हे पटलं नि स्वच्छता मोहीम फत्ते झाली.

 सन १९९० ला के. डी. खुर्द शासकीय सेवेतून मुक्त झाले नि त्यांनी उन्मुक्तपणे समाजसेवेस वाहून घेतलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी नदी, तलावाचं पाणी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य दान' मोहीम राबवली. तिच्या सातत्यांतून गणपतीदान योजना जन्माला आली. ही चळवळ प्रथम खुर्दीसारख्या शिक्षकांनी चिकाटीनं राबवली. पुढे ती महाराष्ट्रभर फोफावली. 'गणपती दान' योजना तर निर्माल्य दान' करणाच्या जनतेनं निर्माण केल्याचं खुर्द सांगतात तेव्हा लक्षात येतं, समाज विज्ञाननिष्ठ बनू शकतो. गरज असते दिशा देण्याची. खुर्दीसारखा बुद्रुक (पूज्य, श्रेष्ठ, सामान्य) समाजसेवीच हे करू शकतो. ते सांगतात, 'आम्ही निर्माल्य दान योजना सतत चार वर्षं राबवली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६५