पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९५५ दरम्यान ते एस. एस. सी. झाले. त्यावेळी मॅट्रिक पास होणं म्हणजे स्वर्गाचे महाद्वार उघडणं असायचं. त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. ऑर्डर हाती आली. हे इतके भोळे की शिक्षणाधिका-यांकडे ऑर्डर घेऊन गेले. सोबत एक अर्ज ‘तुम्ही ‘सादळे' या डोंगर गावी मला नेमलंय, मला शिकायचंय. मी तिथे जाऊ शकत नाही. सबब माझी नियुक्ती रद्द करावी. त्या शिक्षणाधिका-याला हसावं की रडावं ते समजेना! म्हणाले, 'तुम्ही शिकू शकाल अशा ठिकाणी नेमलं तर नोकरी करणार कां? नाही म्हणणं मूर्खपणाचं ठरलं असतं. म्हणून खुर्द 'हो' म्हणाले. शासकीय सेवेत कधी कधी ‘सांन्तॉक्लाज' भेटतो म्हणे. त्यांची नियुक्ती हेरले गावी झाली. नोकरी करत त्यांनी बी. ए. केलं.
 १९५५ चाच काळ. अहमदनगरचे श्री. गोविंदराव पत्की आपल्या मूळ गावी मलकापुरात येऊन स्थिरावले. सेवादल, जनवादी चळवळीचे अभ्यासक पत्की सर आपल्याबरोबर गोविंद पानसरे या गरीब विद्यार्थ्यांस शिकायला घेऊन आले. त्यांचं मलकापूरला कोल्हापूरातून येणं जाणं राहिलं. त्या काळातही तरुण गोविंद पानसरेंचे विचार काळापुढे धावणारे. मलकापूरची तरुण मंडळी त्यांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित. शिवाय पत्की गुरुजींचं प्रबोधन, शिकवण. 'माझी गरिबी हाच माझा गुन्हा आहे', के. डी. खुर्द या मंडळींच्या तालमीत पुरोगामी झाले. घरचं वळण पारंपारिक. ब्राह्मणांचा आदर करावा असे घरचे सांगणे असायचे. पण तत्कालीन शुचिर्भूत वगार्च शुचित्व यांना चकित करत राहायचं. तिकडे मलकापूर हा शेतकरी कामगार पक्षाचा तत्कालीन बालेकिल्ला. श्री. रंगराव पाटील, श्री. त्र्यं.सी. कारखानीसांसारखे आमदार या मलकापूर मतदारसंघाने काँग्रेसचं अधिराज्य असताना कोल्हापूर जिल्ह्यास दिले.
 पुढे वर्षभरातच खुर्द सरांची बदली मलकापुरी झाली. तत्कालीन पहिले राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सनगर गुरुजी त्यांचे मुख्याध्यापक. ते त्या वेळी पुणे विद्यापीठाचे बहि:शाल मंडळ चालवत. खुर्दाना त्यांनी मंडळाचे सचिव पद देऊ केलं. मंडळाच्या व्याख्यानमाला चालायच्या. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, प्राचार्य ए. ए. पाटील प्रभृतींच्या विचारांनी खुर्द प्रभावित झाले नि चाकोरीबाहेर काम करण्याची त्यांना दृष्टी लाभली.
 पुढे ते शिक्षणविस्तार अधिकारी झाले. (१९६७). तीस शाळांचा गट त्यांना मिळाला. ते शाळा तपासण्यास खेडोपाडी जात. सहकारी अधिकारी ‘साहेब' म्हणून वागत. खुर्द सर ‘सर'च राहिले. त्यांनी ‘भाषाशुद्धी प्रकल्प राबवला. त्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांच्या अशुद्ध शब्दाची जंत्री तयार केली. त्यांच्या लक्षात आलं की, अशुद्धाचं ही शुद्ध व्याकरण आहे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६४