करुणाकल्पतरूची सावली : नलिनी वालावलकर
सन १९४० चा काळ आठवा. त्या वेळेच कोल्हापूर म्हणजे चार वेशीतलं गाव होतं. भवानी मंडपाची कमान, बिंदू चौकातील सबजेलची कमान (रविवार गेट म्हणून ती ओळखली जायची),टाऊन हॉल जवळची कमान (आता ती उचलून केशवराव भोसले नाट्यगृहासमोर लावली आहे),शिवाजी पुतळ्याजवळ मंडईच्या दाराजवळ असलेली कमान,अशा वेशीत वसलेल्या कोल्हापूरचा तो काळ आठवा. फोन नव्हते, वीज फक्त वाड्यावर असायची. रस्ते फरशी बोळ होते. मोटारी फक्त हुजूर स्वारींच्याच होत्या. त्या काळात सर्वसामान्य स्त्रियाही घोशा पाळायच्या. स्त्रिया सर्रास शाळेत जात नव्हत्या. अशा काळात नलिनी वालावलकर नावाच्या एका महिलेने कापड दुकान उघडून चक्क गल्ल्यावर बसणे, जथ्थ्याची गि-हाईकं करणं, मिलचे एजंट आले की खरेदीच्या ऑर्डर देणे अशी कामे सुरू करून पारंपारिक कोल्हापुरात चर्चेचं काहूर उठवलं होतं.
हे धाडस नलिनीताई वालावलकरांच्यामध्ये कसं नि कोठून आलं याचा शोध घेताना लक्षात येते की, त्या मूळच्या कोकणातल्या. त्यांचं माहेर व्यापारी कुटुंब असलेलं. व्यापाराचं बाळकडू मिळालेल्या नलिनीताई कोल्हापूरला आल्या त्या नवऱ्या व्यापार करावा म्हणून. करुणाकल्पतरू शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर हे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचित असण्याची दोन कारणं. एक कापड व्यापाराच्या क्षेत्रातील दक्षिण महाराष्ट्रातलं मोठं नाव, दुसरं कारण या माणसानं जे मिळविलं ते महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीनं समाजाला दिलं.