पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नीरक्षीर न्यायव्रती : एस. व्ही. नेवगी

 स्वातंत्र्यपूर्व काळ हा वर्तमान देशस्थितीच्या संदर्भात न्याय नि नैतिकतेचा काळ होता, ही निर्विवाद गोष्ट होय. पोलीस व न्याय यंत्रणेचं भय अपराधी आणि निरपराध अशा दोन्ही वर्गावर होतं. आज अपराधी निडर, बेमुर्वत झालेत. कायदा पाळणारा नैतिकतेस पुण्यकर्म, धर्म म्हणून जपणारा मात्र भांबावून गेल्यासारखी स्थिती आहे. याचं कारण न्याय यंत्रणेची कार्यपद्धती, गती जशी आहे तद्वतच या व्यवस्थेत न्यायमूर्ती एस. व्ही. नेवगींसारखी माणसं अपवादानं दिसणं हेही असावं? समाज चोहोबाजूनी अंधारून येत असताना न्यायमूर्ती नेवगींचं व्यक्तिमत्त्व माझ्यासारख्याला आश्वस्त करतं. आपल्या समाजात अजून न्याय, नैतिकता, कर्तव्यपरायणता आदी मूल्यांची बूज राखली जाते, ती नेवगींसारख्या 'इंद न मम' म्हणनू जगणाच्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे. 'अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' असंही माणसं कधी गुणगुणतात की नाही मला माहीत नाही. पण या ओळीचा आशय जगताना, जागवताना मी नेवगीसाहेबांना पाहतो, तेव्हा ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असा व्यवहार आपसूक घडून येतो.

 न्यायमूर्ती नेवगींचा नि माझा परिचय शांतारामपंत वालावलकर यांच्यामुळे झाला. बालकल्याण संकुलाच्या एका बक्षीस समारंभास बापूंनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. तेव्हापासून मी त्यांना पाहात आलोय. गेल्या पंधरा वर्षांत मला त्यांच्या वर्तन-व्यवहारात कधी काही विसंगत दिसलं नाही. अशी माणसं अपवाद नि अवघड असतात, हे मात्र खरं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४८