पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/148

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्यांच्या उपक्रम सफलतेचं हे गमक होय. अलीकडच्या काळात ते ‘प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाउस' मूळ संस्थेतून विकसित झालेल्या शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेस विद्यापीठ आयोगाचं अनुदान मिळालं होतं. अनुदानापेक्षा कमी पैशात त्यांनी वसतिगृहाची उभारणी केली व उरलेलं अनुदान आयोगाला परत पाठवून एकविसाव्या शतकात आपल्या संतपणाचा सुखद धक्का दिला. हा चमत्कार घडवणारा महापराक्रमी कोण ते पाहण्यासाठी आयोगाचे अधिकारीच चक्क त्यांना भेटण्यास आले. ‘केल्याने होत आहे रे। आधी केलेच पाहिजे।।' हा त्यांचा जीवनमंत्र नव्या पिढीने अंगिकारायला हवा.

 डी. बी. पाटील सर कर्ते सुधारक जसे आहेत तसे समाजचिंतक, शिक्षण तज्ज्ञही आहेत. ते वृत्तपत्रात समकालीन सामाजिक समस्या, शिक्षणविषयक प्रश्न इत्यादींबद्दल नित्य लिहित असतात. अलीकडे त्यांचे शैक्षणिक विचार ग्रंथरूप प्रकाशित झालेत. ते वाचत असताना लक्षात येतं की, या माणसात नव्या बदलाची चाहूल हेरण्याची स्वीकार्यता आहे. त्यातून वर्तमानात बदल घडावा अशी भावना आहे. पण ते भावनेत, भाबडेपणात गुरफटत नाहीत. भावना कार्यप्रवण कशी होईल याबाबत ते प्रयत्नशील असतात. अगदी अलीकडे आम्ही इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले. ती पद्धत समाजहिताची, सामान्याच्या भल्याची आहे हे लक्षात घेऊन आपलं सार.बळ या प्रवेशामागे उभे केलं. 'भिऊ नको मी तुझ्या पाठिशी आहे','खांद्यावर हात ठेवून लढत रहा म्हणणारे' डी. बी. पाटील सर कार्यकर्त्यांसाठी असा डॅशिंग बोर्ड असतो की त्यानं मारलेली उडी विक्रमी असणार हे ठरलेलं. अशा डी. बी. पाटील सरांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने केवळ आनंद नि अभिनंदनाची गोष्ट नसून ती अनुकरण पर्वणी होय. असे अमृतकुंभ, कृतीस्तंभ, अनुभव मेरू या समाजात आहे म्हणून इथं अजून चांगलं टिकलं आहे. ते वाढण्याची उमेद शिल्लक राहते ती डी. बी. सरांसारखे आधारवड जख्ख झाले तरी लख्ख आहेत म्हणून. अशा व्रतस्थ आधार वडाखालीच स्वास्थ्य व सभ्यतेची सावली नांदत असते. मी त्यांना शिक्षण महर्षी म्हणणार नाही कारण असं म्हणून घेणान्यांचा बाजार तेजीत आहे. डी. ब.सारखी जी माणसं आरक्षणाचा उपयोग मुलींसाठी करण्याचा दूरदर्शीपणा दाखवतात ते खरे सेवाव्रती, शिक्षणप्रेमी असतात.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४७