पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रेस सुरू केला. माझा एक वर्गमित्र तिथं कामास होता. त्याच्याकडून कळायचं की डी.बी सर तिथं फार बारकाईने लक्ष देतात.कागद, शाईची खरेदी अल्पदरात करण्याबाबत ते दक्ष असायचे. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।।' हा तुकारामांचा अभंग हे त्यांच्या यशस्वी प्रशासकाचं गुपित म्हणून सांगता येईल. त्यातून संघाने स्वतःची प्रतिष्ठा निर्माण केली. कधी काळी सरकारी अधिका-यांचा मांडलिक,बटीक समजला जाणारा मुख्याध्यापक संघ डी. बी.सरांच्या कुशल संघटन शक्तीच्या जोरावर सरकारी अधिका-यांनाच आपल्या दावणीला बांधता झाला. हा कायाकल्प डी. बी. सरांच्या द्रष्ट्या योजकत्वामुळे शक्य झाला हे कुणासही नाकारता येणार नाही.
 डी. बी. पाटील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य पातळीवरचे अध्यक्ष झाले नि त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने राज्य शिक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था (एस. आय. टी.), महाराष्ट्र शिक्षण संचालनालय, क्रीडा संचालनालय, शिक्षण मंत्रालय असा चौफेर गोफ गुंफत डी. बी. सर राज्यातील एक प्रस्थ' झाल्याचं मी अनुभवलं आहे. ते एक स्वप्न उराशी बाळगतात. कार्यकत्र्यांचा संच उभारतात. विशिष्ट काळात विशिष्ट काम करून आपली छाप उठवतात. मग पदावर मांड ठोकतात. केवळ पदाची आसक्ती हा त्यांचा स्वभाव नाही. पद हे सत्ताकेंद्र असतं तसं सेवा साधनही. त्यांनी नित्य नवी पदं भूषविली पण त्यांचा अहंकार त्यांनी कधी येऊ दिला नाही. उलट हाती आलेल्या सत्तेतून त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावला. एस. एस. सी. चं कोल्हापूर बोर्ड, कोल्हापूरचं क्रीडा संचालनालय यांच्या विकासात सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल' जे पूर्वी पुण्या-मुंबईची मक्तेदारी होती, ते कोल्हापूरला आणलं. त्याची सभासद संख्या वाढवली ती त्याचं मराठीकरण करून, त्यात शिक्षणाच्या व्यावहारिक अडचणी मांडून त्यांनी त्यास माध्यमिक शिक्षणाचं मुखपत्र बनवलं. शिक्षण संक्रमण' पेक्षा लोक त्या वेळी हे जर्नल वाचणे अधिक पसंत करायचे कारण त्यात 'Realities' असायच्या.

 आणिबाणीच्या काळात मी शिक्षक संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता होतो त्या वेळी माध्यमिक शिक्षक संघटना संस्थाधार्जिणी जशी होती तशी ती मुख्याध्यापकांचं ताटाखालचं मांजरही होती. शिक्षक संघटनेचे चक्क मुख्याध्यापकच शिक्षक प्रतिनिधी असायचे. त्या वेळी आम्ही वेगवेगळ्या राजकीय विचारांचे (काँग्रेस, जनसंघ, कम्युनिस्ट) तरुण शिक्षक एक झालो नि शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक प्रतिनिधी शिक्षकच असले पाहिजे असा

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४५