पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाजवून तुझ्याशिवाय शाळा चालू शकते, हे दाखवून दिलं नि तो पुढे सुतासारखा सरळ आला. प्रशासक म्हणून त्यांचा दरारा ही जुनीच गोष्ट होय. आज ती अमृतमहोत्सवी वर्षातही टिकून आहे याचं आश्चर्य वाटतं नि लक्षात येतं की, शिस्त, करारीपणा, व्यवस्था, नियोजन हा त्यांच्या जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग होय. त्या शाळेत त्यांनी क्रीडा महोत्सवात संघ पाठवले व पारितोषिके मिळविली. त्या हायस्कूलचं एक बोर्डिंग होतं. आर्य समाजाची ती शाळा असल्यानं रोज प्रार्थना असायची. मुलं ती चुकवत. सर मागून येऊन चुकार मुलांना पकडत. ते शिकवायचेही चांगले असे माझे मित्र सांगत. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा हौद बांधला आणि आम्हास पोटभर पाणी मिळू लागलं. 'विद्यार्थी केंद्री शिक्षण' असं आज बोललं जातं. त्या वेळी याचा शिक्षणक्षेत्रात गंध नव्हता. त्या काळात डी. बी. सरांची विकास दृष्टी विद्यार्थी केंद्री होती हे विशेष.

 कालांतराने मी शिक्षक झालो. जिथं शिकलो तिथंच शिक्षक होण्याची संधी मिळाली. माझ्या शिक्षक होण्याच्या स्वप्नात साने गुरुजीही होते नि डी. बी. सरही. माझ्या शिक्षकात गरेही आहेत नि काटेही, त्याचं हे रहस्य. मी ज्या आंतरभारती विद्यालयात शिक्षक झालो त्याचे मुख्याध्यापक ए. बी. देशपांडे सर बी. डी. सरांचे स्नेही. सरांचं आमचं हायस्कूलमध्ये नेहमी जाणं-येणं असायचं. ते आमच्या शाळेचे कोणीच नव्हते. पण आमचे शिक्षक त्यांचा आदर करायचे. नंतर कळलं की, ते मुख्याध्यापक संघाचे सर्वेसर्वा आहेत. ते पद त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व महत्त्वाकांक्षेने मिळवलं. ते एव्हाना शाहू दयानंद सोडून महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले होते. पूर्वी मुख्याध्यापक संघ एका विशिष्ट जाती, विचाराचा होता. डी. बी. सरांनी तो बहुजनांचा केला. डी. बी. सर जिथं जातील तिथं आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतात. पूर्वी माध्यमिक मुख्याध्यापक संघ जेवणावळीसाठी प्रसिद्ध होता, सरकारधार्जिणं असं त्याचं स्वरूप होतं. सरांनी ते बदललं. त्यांनी या संघास ‘शैक्षणिक संस्था संघटक संघ' असं रूप दिलं ते कार्यातून. त्यांनी सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे चाचण्या, परीक्षा केंद्रीय पद्धतीने सुरू केल्या. त्यामुळे परीक्षांत एकवाक्यता आली. त्यासाठी त्यांनी विषय शिक्षक समित्या निर्माण केल्या. त्यातून शाळातील शिक्षक व शाळा यात एक सुसंवाद सुरू झाला. त्यातून संघास आर्थिक बळ नि बाळसं लाभलं. त्यातून शिवाजी पार्कसारख्या प्राइम लोकेशनवर संघाची स्वतःची वास्तू ‘विद्याभवन' उभी राहिली. खेड्यातून शाळेच्या कामासाठी येणाच्या मुख्याध्यापकांची निवासाची सोय झाली.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१४४