शिक्षण संघटक : डी. बी. पाटील
डी. बी. पाटील सरांना मी सन १९६० पासून ओळखतो. तेव्हा मी १० वर्षांचा होतो नि शाह दयानंद मोफत मराठी शाळेत पाचवीत शिकत होते. आमच्या शाळेस लागूनच शाहू दयानंद हायस्कूल होते. सर तिथे प्रथम शिक्षक, नंतर मुख्याध्यापक झाले. मला त्या वेळची एक आठवण लक्षात आहे. सर मुख्याध्यापक झाल्यानंतर त्या हायस्कूलने कात टाकली. तिथे शिस्त आली. नवनवीन सुविधा त्यांनी सुरू केल्या. त्यातील एक सुधारणा पक्की माझ्या लक्षात आहे. त्यांनी एका वर्गात वाचनालय स्वतंत्रपणे सुरू केले. तिथं वर्तमानपत्रे, मासिके ठेवली जायची. आम्ही मराठी शाळेतील मुले तिथे वाचण्यास जात असू. तिथं ‘बहुश्रुत माला लागायची. ते एक मासिक होतं. ते मी वाचायचो. कारण त्यात माझ्या ओळखीच्या सुधाकर प्रभू या बालसाहित्यिकाचं लेखन छापून यायचं. मला लेखक होण्याची प्रेरणा या वाचनालयानं प्रथम दिली. शिक्षकानं सतत उपक्रमशील असलं पाहिजे. आपले छोटे प्रयत्न पण विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यास कारणीभूत होतं राहतात, हे मी डी. बी. पाटील सरांच्या उपक्रमशीलतेतून शिकलो.
पुढे मी आंतर भारती विद्यालयात शिकण्यास गेलो पण माझे अनेक मित्र डी. बी. सरांच्या हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यांच्या बोलण्यातून नि माझ्या त्यांच्या शाळेत जाण्या-येण्यातून लक्षात आलं की ती शाळा पूर्वी काही दखलपात्र नव्हती. सरांनी तिथे मैदान विकसित केलं. वर्ग बांधून विस्तार केला. शिस्त आणली. त्या वेळी बजरंग नावाचा शिपाई होता. नाव शिपाई पण, त्याचा व्यवहार साहेबाचा असायचा.