पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आयुष्यभरच्या ध्यास, बांधिलकी आणि तळमळीनं... त्यांचं नाव प्रा. संभाजीराव जाधव! ते वार्धक्य व अल्पशा आजाराने निधन पावले. संघटनांचा एक झंझावात निमाला! प्राध्यापक समाजापुढे तो झंझावात एक यक्षप्रश्न ठेवून गेलोय... नोकरीला पैसे द्यावे लागतात... सगे सोयरे फिक्सिगं करतात... सीएचबींना वाली नसणं... जे सुरक्षित आहेत ते अतिरिक्त सुखी... सुस्त...! संघटनेचा पोशिंदा हरवणं म्हणजे समाजाचं अनाथ होणं असतं. तो असेपर्यंत संघटना कवचकुंडल असते... नसला की माणूस माणूस गलितगात्र! कधी-कधी माणसं जाईपर्यंत त्यांचं असणं, महत्त्व उमजत नसतं... तसं प्रा. संभाजीराव जाधव यांचं! जायच्या आदल्या आठवड्यात अॅपेक्स हॉस्पिटलच्या कॉटवर निरोप घेतानाही प्रा. बाबा पाटील, प्रा. सुधाकर मानकरना डॉक्टरांच्या टिप्स विसरून संघटनेचा गुरुमंत्र देत राहणं...! याचा मी साक्षीदार आहे.
 पुण्यातून इंग्रजीत एम. ए. होऊन प्रा. संभाजी जाधव हे वारणा महाविद्यालयात रुजू झाले. प्राचार्य भा. शं. भणगे नि त्या वेळी प्राध्यापक असलेल्या अ. के. भागवतांमुळे ते इथल्या कॉमर्स कॉलेजात आले. तेथून संस्थेची गरज म्हणून छ. शहाजी महाविद्यालयात. संघटनेचे काम करतात म्हणून नोकरी गेली. मग महावीर महाविद्यालयात असा त्यांचा पोटार्थी नोकरीचा प्रवास असला तरी तो मात्र त्यांचा जीवन आलेख नव्हे! त्यांचं जीवन म्हणजे प्राध्यापक संघटनेचे कार्य... प्रतिष्ठा आणि कर्तृत्व!

 प्रा. संभाजीराव जाधव यांनी संघटनेचे कार्यकरावी अशी काही त्यांची पार्श्वभूमी नव्हती. जमीनदार कुटुंब, संस्थानी सासर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. ग. प्र. प्रधान, डॉ. जे. पी. नाईक, गं. बा. सरदार अशा पूर्वसुरींचा मेळ व मेळावा असताना त्यांनी संघटनेकडे ओढ घ्यावी याचं रहस्य त्यांच्यातील सव्यसाची वाचकात दडलयं. ते इंग्रजीचे निष्णात प्राध्यापक, मराठी साहित्याचे व्यासंगी. घरी हजारो पुस्तकांच्या गराड्यात झोपणारे संभाजीराव ज्यांनी पाहिले असतील त्यांना त्यांच्या ग्रंथ ऐश्वर्याचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. तो नुसता संग्रह नव्हता. स्वतः नित्य डोळे फिरवायचे नि हातही! (पुस्तकं लावण्याचही नाद होता. ब्रशनी पुस्तकं साफ ठेवत.) महावीर महाविद्यालयात मी स्टाफरूममध्ये पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांच्या शेजारी बसायचो. एखादा विषय सुरू केला की, संभाजीराव तासनतास अनके संदर्भ देत बोलत राहात. ते बहुश्रुत होते. त्यांना शिकवायची तयारी नाही करावी लागायची. प्राध्यापक संघटनेच्या कामासाठी त्यांना नेहमी मुंबईला जावे लागायचं...

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३९