पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकशाहीत लोकप्रतिनिधी हा सर्वश्रेष्ठ, अधिकारी, शासकीय अधिकारी ब-याचदा हुकूमशहा होऊ पाहतात. बाबूराव धारवाडे अशा प्रसंगी कधी कौशल्याने तर कधी धोरणीपणे प्रशासकीय सनदी अधिका-यांना त्यांचा योग्य तो मान ठेवून मर्यादांची जाणीव करून देतात. हे बाबूरावच करू जाणे. जिथे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा अधिका-यांपुढे मान तुकवताना मी प्रत्यही पहातो; तिथं बाबूरावांचा करारीपणा, ताठ मान मला सतत अनुकरणीय वाटत आली आहे.

 बाबूराव धारवाडे कार्यकर्ते असले तरी त्यांचे राहणीमान हे पुढाऱ्याला साजेसं. हा असतो त्यांच्यावरील काँग्रेसी संस्कृतीचा प्रभाव, शुभ्र खादीचे खळ घातलेले करकरीत पोषाख ही त्यांची करारी व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात असतात. अलीकडे त्यांना कमी ऐकू येतं हे किती बरं आहे. सामाजिक प्रदूषणातून त्यांची आपोआप झालेली मुक्ती मला या वयात लाभलेलं एक वरदानच वाटतं. अन्यथा, कान किटून जाण्याचाच बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला असता. बाबूराव धारवाडे सतत कार्यरत राहिल्यानं त्यांनी अमृतमहोत्सवी वय जेव्हा गाठलं ते कळलंसुद्धा नाही. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने तेव्हाच जाऊ शकेल, जेव्हा त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्ती होईल. त्यांना स्वप्नपूर्तीच्या शुभेच्छा देणारा हा लेख लिहिताना सतत एक आशा मनात आहे. एकविसावं शतक हे आत्मकेंद्रित माणसाचं राहणार असा नूर आहे. अशा स्थितीत बाबूराव धारवाडे यांचं जीवन व कार्य नव्या पिढीस एक आश्वासक दिलासा देत राहील. जग अंधारलं हे खरं आहे, पण काळोखातही एक कवडसा शिल्लक असण्याची उमेद हेच त्यांच्या जीवनाचं मला फलित वाटतं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३७